पिलिभीत : ऊस विकास आणि साखर उद्योगाच्या अधिकृत अहवालानुसार, उत्तर प्रदेशात ११९ साखर कारखान्यांकडे ९,१४४ कोटी रुपये ऊस थकबाकी आहे. यामध्ये गेल्या वर्षातील ६९९.४७ कोटी रुपयांचाही समावेश आहे. साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी ३५,२०१.३४ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता. यापैकी ३४,५०१.८८ कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. उर्वरीत रक्कम थकीत आहे. यावर्षी जानेवारीपर्यंत गाळप केलेल्या उसाचे मूल्य २१,२३१.९७ कोटी रुपये आहे. यापैकी शेतकऱ्यांना केवळ १२,७८७.०४ कोटी रुपयांची बिले मिळाली आहेत. कारखान्यांकडे ८,४४४.९३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
ऊस आणि साखर उद्योगाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, राज्य सरकारने जवळपास ४६ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १,९५,०६० कोटी रुपयांची उच्चांकी बिले दिली आहेत आणि उत्तर प्रदेशला देशात ऊस आणि साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आणले आहे. शेतकरी नेते व्ही. एम. सिंह यांनी हा दावा खोडून काढताना म्हटले आहे की, ऊस विभागाने सांगितलेली ऊस बिलांची देय रक्कम गेल्या सहा वर्षांची सरासरी आहे.
याशिवाय अधिकृत अहवालावरुन असे दिसून येते की, राज्यातील साखर उत्पादन घटत्या स्तरावर आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने राज्यातील कारखान्यांकडून ऊसाचे गाळप कमी होत आहे. २०१९-२० मध्ये कारखान्यांनी १,११८.२० लाख क्विंटल उसाचे गाळप करून १२६.३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. २०२०-२१ मध्ये ऊस गाळप घटून १.०२७.५० लाख क्विंटलवर आले तर साखर उत्पादन ११०.५९ लाख क्विंटल झाले. २०२१-२२ मध्ये एकूण ऊस उत्पादन १,०१६.२६ लाख क्विंटल झाले असून साखर उत्पादन १०१.९८ लाख क्विंटलवर आले.