पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग हे 21 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारताचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) आणि सिंगापूरचे पे नाऊ दरम्यान क्रॉस-बॉर्डर कनेक्टिव्हिटीचा प्रारंभ करतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि मॉनेटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूरचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ होईल.
फिनटेक नवोन्मेषच्या बाबतीत भारत सर्वात वेगाने वाढणारी परिसंस्था म्हणून उदयाला आला आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट डिजिटल पेमेंट व्यवस्थेच्या जागतिकीकरणाला चालना देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले आहे. यूपीआयचे फायदे केवळ भारतापुरते मर्यादित न राहता इतर देशांनाही त्याचा लाभ मिळावा यावर पंतप्रधानांचा प्रामुख्याने भर आहे. या दोन पेमेंट व्यवस्थांच्या जोडणीमुळे दोन्ही देशांतील रहिवाशांना सीमेपलीकडून पैशाचे जलद आणि किफायतशीर हस्तांतरण करता येईल. यामुळे सिंगापूरमधील भारतीय समुदायाला विशेषत: स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थ्यांना सिंगापूरमधून भारतात आणि भारतातून सिंगापूरमध्ये तात्काळ आणि कमी खर्चात पैसे हस्तांतरित करता येतील.
(Source: PIB)