पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? तांदूळ २०० रुपये किलो, टोमॅटो १६० रुपये किलो

आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या पाकिस्तानच्या जनतेला आणि शहबाज शरीफ सरकारला दररोज नवा फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी विज दरात वाढ झाल्याने महागाईने त्रस्त पाकिस्तानी जनतेवर संकट कोसळले. शहबाज शरीफ सरकारच्या महागाईचा नवा डोंगर आपल्यावर कधी कोसळेल, अशी भीती जनतेला वाटत आहे. पाकिस्तानचा परकीय चलनसाठा दोन-अडीच अब्ज डॉलरपर्यंत घसरला आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाक सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) मदत मागितली आहे. मात्र, सद्यस्थितीत आयएमएफने एक अब्ज डॉलर कर्ज देण्याबाबत गप्प राहणे पसंत केले आहे.

आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शहबाज सरकारने अध्यादेश काढून आयएमएफच्या अटींचा पालन करीत असल्याचा दावा केला आहे. मात्र, पाकिस्तानच्या झोळीत पैसे मिळालेले नाहीत. दुसरीकडे जनतेमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. आट्यापासून दुध आणि तांदळापर्यंत सर्व वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तानात आटा १२० रुपये प्रती किलोने विक्री केला जात आहे. दूध १५० रुपये लिटर, तांदूळ २०० रुपये किलो, बटाटे ७० रुपये किलो, टोमॅटो १३० रुपये किलो तर, पेट्रोलची २५० रुपये लिटर दराने विक्री केली जात आहे. चहा पावडरच्या दरानेही उसळी घेतली आहे. गेल्या एका आठवड्यात एक किलो चहापावडरच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली असून हा दर १६०० रुपये किलोवर पोहोचला आहे. देशासाठी मागवलेली चहा पावडर बंदरात अडकली आहे. पाकिस्तान सरकारकडे पैसे नसल्याने मालाची डिलिव्हरी झालेली नाही. पाकिस्तानच्या चलनाचा दर डॉलरच्या तुलनेत घसरुन २७५ वर पोहोचला आहे. ही आजवरची सर्वोच्च निच्चांकी स्थिती आहे. महागाई वाढून २७ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या ५० वर्षातील हा उच्चांक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here