लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील साखर उद्योगाने घेतलेल्या भरारीचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या सहा वर्षात राज्यातील साखर कारखान्यांनी आधुनिकतेची कास पकडली आहे. आज, उत्तर प्रदेशातील साखर कारखाने पुढे येऊन शुगर कॉम्प्लेक्सच्या रुपात समोर येत आहेत. एकाच ठिकाणी साखर उत्पादित होत आहे, सहवीज निर्मिती प्लांटही उभारला आहे आणि ऑक्सिजन तसेच इथेनॉल प्लांटही आहेत.
भास्करमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री म्हणाले की, देशात सर्वाधिक ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन करणारे राज्य आज पंतप्रधानांची धोरणे स्वीकारत सर्वात जादा इथेनॉल उत्पादन करत ग्रीन एनर्जीचा स्त्रोत म्हणून ओळखला जात आहे. या बदलांतून आमचे हजारो ऊस उत्पादक शेतकरी समृद्ध आणि सुखी जीवन जगत आहेत.
राज्यातील साखर उद्योगाला १२० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित ऐतिहासिक कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी म्हणाले की, १२० वर्षापूर्वी शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन गोरखपूर जिल्ह्यातील देवरिया (प्रतापपूर) मध्ये पहिला साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता. मात्र, अलिकडील काही दशकात ज्या पद्धतीने कारखाने बंद पडत होते. त्यातून शेतकरी हताश झाले होते. साखर उद्योगासमोर त्यांनी मोठे संकट उभे केले. मात्र, २०१७ पासून चित्र बदलले. साखर कारखान्यांशी संवाद साधत आम्ही विकास केला. मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या सहा वर्षात डबल इंजिनसरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख ९७ हजार कोटी रुपयांची बिले डीबीटीच्या माध्यमातून दिली आहेत. लवकरच हा आकडा २ लाख कोटीपर्यंत पोहोचेल. राज्यातील १०० कारखाने शेतकऱ्यांना १० दिवसांत ऊस बिले देतातस हा खूप मोठा बदल आहे.