गलवान घाटीत २०२० मध्ये भारत-चीन या दोन्ही देशांच्या सैनिकांमधील झटापटीच्या प्रकारानंतर चीनसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. या घटनेनंतर चीनमधील वस्तूंच्या विरोधात बहिष्काराचे आवाहनही सुरू झाले. मात्र, वस्तूस्थिती वेगळीच आहे. चीनसोबतच्या व्यापारी संबंधांवर याचा कोणताही फरक पडलेला नाही. व्यापारी संबंधांमध्ये चीनचे पारडे जड आहे. कारण, चीनकडून केल्या जाणाऱ्या आयातीमध्ये वाढच झाली आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, वाणिज्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, गेल्या १० महिन्यात चीनकडून केल्या जाणाऱ्या आयातीत वाढ दिसून आली आहे. २०२२-२३ मधील जानेवारी महिना म्हणजे गेल्या दहा महिन्यात चीनकडून केल्या जाणाऱ्या मालाच्या आयातीने उसळी घेतली आहे. तर या कालावधीत चीनला केली जाणारी निर्यात झपाट्याने कमी झाली आहे. चीनला जाणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीमध्ये ३४ टक्क्यांची घट झाली आहे.
भारत चीनकडून सर्वाधिक आयात करतो. २०२२-२३ मध्ये आयातीत चीनचा हिस्सा १३.९१ टक्के आहे. भारताने १० महिन्यात एकूण ८३.७६ अब्ज डॉलरची आयात चीनकडून केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ९ टक्क्यांची वाढ झाली. या कालावधीत भारताने चीनला केवळ १२.२० अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. भारताकडून चीनला केली जाणारी निर्यात अवघी ३.३० टक्के आहे. तर एकूण निर्यातीमध्ये २०२० मध्ये चीनला केली जाणाऱ्या निर्यातीत भारताचा हिस्सा ७ टक्के असत होता. तर १४० देशांत भारताकडून केल्या जाणाऱ्या निर्यातीत वाढ दिसून आली आहे.