पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान ) योजनेंतर्गत सुमारे 16,800 कोटी रुपयांचा 13 वा हप्ता थेट लाभ हस्तांतरणद्वारे 8 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केला.
कर्नाटकातील बेळगावी येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमाला हजारो शेतकरी उपस्थित होते, तर कोट्यवधी शेतकरी आणि अन्य लोक ऑनलाइन सहभागी झाले होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज बेळगावी इथून संपूर्ण भारताला मोठी भेट मिळाली आहे. आज पीएम-किसानचा आणखी एक हप्ता देशातील शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आला आहे. केवळ एका क्लिकवर देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम पोहोचली आहे. एवढी मोठी रक्कम एका क्षणात हस्तांतरित झाली आहे , ना कुणी मध्यस्थ, ना काही कट-कमिशन, ना भ्रष्टाचार, हे मोदी सरकार आहे, प्रत्येक पैसा तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. भारतात 80-85% छोटे शेतकरी आहेत, आता या छोट्या शेतकऱ्यांना सरकारचे प्राधान्य आहे. सुमारे 2.5 लाख कोटी रुपये छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आले आहेत.
यातले 50,000 कोटी रुपये आपल्या माता भगिनींच्या खात्यात जमा झाले आहेत. पंतप्रधान म्हणाले की, 2014 पासून देश सातत्याने कृषी क्षेत्रात परिवर्तनीय बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आम्ही शेतीला आधुनिकतेची जोड देत आहोत. 2014 मध्ये देशात कृषी क्षेत्रासाठी 25,000 कोटी रुपये तरतूद होती , ती आता 1,25,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आम्ही अधिकाधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डशी जोडत आहोत. आमच्या सरकारने ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी पीएम प्रणाम योजना सुरू केली आहे, या योजनेद्वारे रासायनिक खताचा कमी वापर करणाऱ्या राज्यांना केंद्राकडून अतिरिक्त मदत मिळेल.
मोदी म्हणाले की, आपले भरड धान्य प्रत्येक हंगामाला , प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम आहे आणि ती अधिक पौष्टिकही आहेत, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आम्ही भरडधान्याला श्री अन्न अशी नवी ओळख दिली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याबाबत बोलले आणि त्यासाठी देशभरात आवाहन केले, तेव्हा सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली, ज्याचा शेतकऱ्यांना सातत्याने लाभ होत आहे.