अफगाणिस्तानच्या लोकांसाठी भारत २० हजार मेट्रिक टन गहू पाठवणार

नवी दिल्ली : भारत अफगाणीस्तानातील लोकांसाठी २० हजार मेट्रिक टन गहू पाठवणार आहे. अफगाणिस्तानच्या लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोक उपासमारीने त्रस्त आहेत. चाबहार बंदरातून अफगाण लोकांसाठी २० हजार मेट्रिक टन गहू पाठवण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्रांसोबत भागीदारी करत आहे. आर्थिक संकटामुळे अफगाणिस्तानमध्ये सहा दशलक्ष लोकांना दुष्काळाचा धोका आहे.

भारत आणि पाच मध्य आशियाई देशांनी मंगळवारी अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही दहशतवादी कारवायांसाठी वापरू नये या मागणीवर भर दिला. नवी दिल्ली येथे अफगाणिस्तानवरील भारत-मध्य आशिया संयुक्त कार्यगटाच्या पहिल्या बैठकीत, भारताने चाबहार बंदर (इराण) द्वारे अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गहू पाठवण्याची घोषणा केली. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत अफगाणिस्तानला ही मदत दिली जाणार आहे. भारताने यापूर्वीच ५० हजार मेट्रिक टन गहू पाठवला आहे. त्यावेळी पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात गहू पाठवला होता. अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर पाकिस्तानने गहू पाठवण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला होता. या बैठकीत सहभागी झालेल्या देशांनी दहशतवाद, अतिरेकी, कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यांचा सामना करण्यासाठी मार्ग शोधण्याचा संकल्प केला. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक राजकीय संरचनेच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, भारतासह इतर अनेक देशांनी तालिबानच्या महिला शिक्षणावरील बंदीवर टीका केली होती. दरम्यान, युनिसेफचे उप कार्यकारी संचालक उमर आबिद यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे की त्यांनी अफगाणिस्तानातील महिला आणि बालकांचे मूलभूत हक्क विसरू नयेत, तसेच त्यांना मदत करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here