हापुड : सिंभावली आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाली नसल्याने भारतीय किसान युनियन अराजकीयने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून दोन्ही कारखान्यांकडून शेतकऱ्यांना बिले मिळवून देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. भाकियू जिल्हाध्यक्ष पवन हुण यांनी सांगितले की, जिल्ह्यात जवळपास ७० हजार शेतकरी ऊस उत्पादन करतात. शेतकऱ्यांचे ३२५ कोटी रुपये सिंभावली साखर कारखान्याने तर ब्रजनाथपूर साखर कारखान्याने १७५ कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियूचे शहराध्यक्ष राजवीर भाटी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने दोन्ही साखर कारखान्यांना प्रती महिना ५० कोटी रुपयांची बिले अदा करण्यास सांगितले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापर्यंत केवळ २८ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा शर्मा यांना निवेदन देवून दोन्ही कारखान्यांकडून थकीत ऊस बिले देण्याची मागणी केली. यावेळी रवी भाटी, मोनू त्यागी, अतुल त्यागी, मूलचंद त्यागी, अर्पण तेवतिया, अनिल अधाना, जतीन नागर, वसीम चौधरी आदी सहभागी झाले होते.