नवी दिल्ली : गव्हाच्या किमतीवर नियंत्रणासाठी भारतीय अन्न महामंडळाने ई लिलावाद्वारे ४५ लाख टन गहू विक्री करण्याच्या निर्णयाचे परिणाम दिसून येत आहेत. पाच लिलावांमध्ये आतापर्यंत २८ लाख टनाहून अधिक गव्हाची विक्री झाली आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात स्थिरता दिसत आहे. लिलावादरम्यानच्या किमतींमधून आता बाजारात संथ स्थिती असल्याचे दिसून येत आहे. सरासरी २२०० रुपये प्रती क्विंटलपेक्षा कमी दर झाले आहेत. गव्हाच्या नव्या खरेदीसाठी २१२५ रुपये एमएसपी आहे. गव्हाच्या किमती नियंत्रणासाठी अन्न महामंडळाद्वारे दर आठवड्याला ई – लिलाव केले जात आहेत.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच लिलावांतून एकूण २८.८६ लाख टन गव्हाची विक्री झाली आहे. पुढील लिलाव १५ मार्च रोजी होईल. कारण एक एप्रिलपासून सरकारी गहू खरेदी सुरू होईल. त्यामुळे सरकारने लिलाव प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पाचव्या लिलावात गहू २१९७.९१ रुपये प्रती क्विंटल दराने विकला गेला. पहिल्या लिलावात ९.१३ लाख टन गहू २४७४ रुपये प्रती क्विंटल दराने खुल्या बाजारात विकला गेला होता. दुसऱ्या लिलावात दोन हजार ३३८ रुपये प्रती क्विंटल तर तिसऱ्या लिलावात ५.०७ लाख टन २१७३ रुपये प्रती क्विंटल दर होता. तर चौथ्या लिवावावेळी २१९३.८२ रुपये प्रती क्विंटल दराने गव्हाची विक्री झाली.