नवी दिल्ली : भारतात अन्नधान्य पिकांचे अतिरिक्त उत्पादन होते, त्याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. कारण, सरकार कार्बन उत्सर्जनासोबतच देशाचे इंधन बिल कमी करू इच्छित आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. मनीकंट्रोल पॉलिसी नेक्स्ट- १० ट्रिलियन इन्फ्रा पुश शिखर परिषदेत बोलताना मंत्री गडकरी म्हणाले की, भारतामध्ये साखर, मक्का आणि गव्हाचे अतिरिक्त उत्पादन होते, त्याचा वापर २० टक्के इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो.
इथेनॉलला भविष्याचे इंधन असा उल्लेख करुन मंत्री गडकरी यांनी सांगितले की, सरकारने तुकडा तांदूळ, धान्य, मक्का, उसाचा रस आणि मोलॅसीसपासून इथेनॉल तयार करण्याची योजना तयार केली आहे. २०२२ मध्ये भारताने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट मिळवले आणि आता २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट आहे. भारतात, इथेनॉल मुख्यत्वे उसासारख्या साखर-आधारित पिकांच्या किण्वन प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. मका आणि भाताचे देठ आणि काही जड मोलॅसिससारख्या यांसारख्या कृषी अवशेषांपासूनदेखील जैवइंधन तयार केले जाते. या बाबी आमच्याकडे यावर्षीदेखील अतिरिक्त आहेत. त्यामुळे साखरेला इथेनॉलमध्ये बदलण्याची ही चांगली वेळ आहे. गडकरी यांनी इंधनात मेथनॉल मिश्रणाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, त्यांनी अलिकडे बेंगळुरुमध्ये २० बस लाँच केल्या आहेत. या बसमध्ये डिझेलसोबत मेथनॉल वापरले जाते.