हरदोई: पावसाने शेतीचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता कमीच

हरदोई : अतिवृष्टी आणि पावसामुळे उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना भरपाई मिळण्याची वाट खडतर असल्याचे स्पष्ट होत आहे. पिकांसाठी केलेला खर्च भरुन काढणेही लाखो शेतकऱ्यांसाठी मुश्किल बनले आहे. अशातच सरकारी सर्व्हेतील नियमांमुळे जिल्ह्यातील १.५० लाख हून अधिक शेतकऱ्यांना भरपाई मिळणे कठीण आहे. पिक विमा काढलेल्या हजारो शेतकऱ्यांनाही लगेच मदत मिळत नसल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर जेव्हा पिकाची कापणी होईल, तेव्हा त्या आधारावर त्यांना लाभ मिळेल.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील बिलग्राम, माधौगंज व मल्लावा विभागातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सर्व्हेच्या नियमानुसार जर नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असेल तरच मदत दिली जाते. ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवला आहे, त्यांनी नुकसानीनंतर ७२ तासात ऑनलाइन अर्ज करण्याची गरज आहे. ही मुदतही संपली आहे. अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आलेला नाही. सर्व तालुक्यांत उप जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृ्त्वाखाली महसूल विभागाकडून सर्व्हे सुरू आहे. त्याचा लाभ किती मिळेल याविषयी साशंकता आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ३० टक्के नुकसान झाले आहे. यंदा जिल्ह्यात ३,१४,६५१ हेक्टरमध्ये गहू, तर मोहरी २४,३६९ हेक्टर, मसूल ११,४२० आणि जवस १८,२२० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भरावन, बघौली आणि बेहंदर विभागातील अतिवृष्टीने जादा नुकसान झाले आहे. कृषी विभागाचे उपसंचालक डॉ. नंद किशोर यांनी सांगितले की, पंतप्रधान पिक विमा योजनेत किती शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज केले, टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली याचा तपशील घेतला जात आहे. त्यानंतरच याविषयी निर्णय घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here