पंजाबमध्ये अवकाळी पावसाने अलिकडेच हजेरी लावल्याने जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये गव्हाच्या कापणीस सुमारे दोन आठवड्यांचा उशीर होईल, अशी शक्यता आहे.
दरम्यान, राज्य सरकारने एक एप्रिलपासून आपली गहू खरेदी केंद्रे सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हवामानाची स्थिती पाहता राज्यात १५ एप्रिलनंतर गव्हाची कापणी सुरू होईल.
अलीकडेच झालेल्या पावसाने शेतकरी चिंतित आहेत. या पावसाने पिकावर ब्लॅक पॉइंटसारख्या फंगल रोगांचा फैलाव होऊ शकेल. त्यातून धान्याची गुणवत्ता घसरेल अशी भीती त्यांना आहे.
सध्याच्या काळात पाऊस गव्हाच्या पिकासाठी योग्य नाही. मोगा येथील वनस्पती संरक्षण अधिकारी डॉ. जसविंदर सिंह बराड यांनी सांगितले की, यातून धान्याचा काळसरपणा वाढू शकतो आणि धान्याची गुणवत्ता घसरू शकते.