चंदीगढ : पंजाबमध्ये २४ मार्चपासून जोरदार पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीमुळे रब्बी हंगामादरम्यान पेरणी करण्यात आलेल्या ३४.९ लाख हेक्टर गव्हापैकी किमान १४ लाख हेक्टर (४० टक्के) पिकाला फटका बसला आहे. कृषी संचालक गुरविंदर सिंह यांनी सांगितले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अलिकडेच पिक पाहणीचा आदेश दिला होता. आणि आम्ही आता याचा आढावा घेत आहेत. नुकसानीचा आढावा घेणाऱ्या एका महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहोत. तरच ही प्रक्रिया लवकर पूर्ण करता येईल. मंगळवार आणि बुधवारी राज्यात किरकोळ ठिकाणी आणखी पावसाची तसेच जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले की, सहा एप्रिलपासून हवामान साफ असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, एकूण उत्पादनापैकी कमीत कमी १५ ते २० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे. पावसाआधी गव्हाचे एकूण उत्पादन १७० ते १७५ लाख टन होईल अशी शक्यता गृहित धरण्यात आली होती. मात्र, आता हे उत्पादन १४५ ते १५० लाख टनापर्यंत असेल अशी शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, धान्याच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होऊ शकतो. राज्यात एक एप्रिलपासून गव्हाच्या खरेदीसाठी एकूण १८७२ केंद्रे सुरू करण्यात येणार होती. मात्र, तीन एप्रिलपर्यंत गव्हाची आवक झालेली नाही. आतापर्यंत केवळ राजपुरा मंडईत ८ हजार क्विंटल धान्य घेवून दोन ट्रॅक्टर – ट्रॉली आल्या आहेत. सलग दुसऱ्या हंगामात गव्हाच्या पिकाला फटका बसला आहे. गेल्या वर्षी जवळपास १५ टक्के उत्पादन खराब झाले होते. तर शेतकऱ्यांचे ६,००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, केंद्र सरकारच्या अन्न महामंडळासोबत आपल्या चार खरेदी एजन्सींच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून धान्य खरेदी करतो. या विभागाने केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाला गव्हाच्या खरेदीसाठी निकषात सवलत देण्याची मागणी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या संशोधकांचे एक पथक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचा दौरा करेल अशी शक्यता आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधकांनी कर्नालमध्ये भारतीय गहू आणि जवस संशोधन संस्थेमुळे नुकसानीचे प्रमाण जाणून घेण्यासाठी पंजाबचा दौरा करेल. गुरविंदर सिंह यांनी सांगितले की, आम्ही जो अहवाल सादर केला आहे, त्याच्या आधारावर वैज्ञानिकांनी नुकसान तितकेच झाल्याचे म्हटले आहे.