कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट (NSI, कानपूर) ने मक्क्यापासून इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ICAR-भारतीय मक्का संशोधन संस्था (लुधियाना) सोबत एक सामंजस्य करार (MoU) केला. सोमवारी लुधियानामध्ये नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचाक प्रोफेसर नरेंद्र मोहन आणि आयसीएआर-भारतीय मक्का संशोधन संस्थेचे संचालक एच. एस. जाट यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य कराराद्वारे आयसीएआर-भारतीय मक्का संशोधन संस्थेद्वारे विविध कृषी जलवायू क्षेत्रासाठी उपयुक्त मक्क्याच्या नव्या संकरीत बियाण्यांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले जाईल. आणि नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटद्वारे आपल्या नॅनो इथेनॉल युनिटमध्ये त्याच्या इथेनॉल उत्पादन क्षमतेचे मूल्यांकन केले जाईल. या वेळी दोन्ही संचालकांनी सांगितले की, सामंजस्य कराराद्वारे मक्का उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि मक्क्यावर आधारित इथेनॉल उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न यशस्वी होतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.
वर्ष २०२५ पर्यंत इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मक्का पीक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जवळपास ७,००० मिलियन लिटर अल्कोहोलचे उत्पादन धान्य, तांदूळ आणि मक्क्यापासून केले जाईल. प्रोफेसर नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, शेतकरी आणि उद्योगांसाठी मक्क्यावर आधारित अल्कोहोलसाठी एक स्व-टिकाऊ, जैव रिफायनरी मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यासह कारखान्याची उत्पादकता वाढविण्यावरही काम केले जाईल. देशात मक्क्याची कृषी उत्पादकता जवळपास २.७-२.९ टन प्रती हेक्टर कमी आहे आणि जगाच्या तुलनेत सरासरी जवळपास निम्म्यावर आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या प्रमुख मक्का उत्पादक राज्यांमधील उत्पादकता खूप विभिन्न आहे. भाकृअनुप-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्लेट्स रिसर्चचे संचालक डॉ. एच. एस. जाट यांनी सांगितले की, विविध कृषी, हवामान परिस्थितीसाठी उपयुक्त मक्क्याच्या नव्या प्रजाती विकसित करून हा मुद्दा सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.