नवी दिल्ली : केंद्र सरकारने पंजाब, चंदीगढ, हरियाणा आणि राजस्थानमध्ये गहू खरेदीसाठी गुणवत्तेच्या निकषांमध्ये सवलत दिली आहे. संकटग्रस्त विक्री रोखण्यासह शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अलिकडेच अवकाळी पाऊस, गारपिट आणि वादळी वाऱ्याने या राज्यांतील काही भागात कापणीसाठी तयार असलेल्या गव्हाचे नुकसान झाले होते. या राज्यातील सरकारांनी खरेदीच्या निकषात सवलत देण्याची मागणी करण्यात आली होती. सद्यस्थितीत मध्य प्रदेशात गव्हाची खरेदी सुरू आहे. तर इतर राज्यांत अवकाळी पावसामुळे यास उशीर झाला आहे. देशाच्या स्वामित्वाखालील भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) राज्यस्तरावरील एजन्सींकडून गव्हाची खरेदी केली जाते.
अमर उजाला मधील वृत्तानुसार, केंद्रीय अन्न मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुबोध कुमार सिंह यांनी सांगतिले की, फिल्ड सर्व्हेनंतर आम्ही या राज्यांतील गहू खरेदीच्या निकषांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होतील. नेहमीच्या ६ टक्के प्रमाणातील खराब तथा तुकडा पडलेल्या धान्याची मर्यादा १८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या धान्याच्या खरेदी दरात कपात केली जाणार नाही. दरम्यान, सरकारने १० एप्रिलअखेर १३.२० लाख टन गव्हाची खरेदी केली आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली. यातील बहुसंख्य खरेदी मध्य प्रदेशात झाली आहे. पंजाबमध्ये १००० टन गव्हाची खरेदी झाली असून हरियाणात ८८,००० टन गहू खरेदी करण्यात आला आहे.