मिरपूरखास : जिल्हा प्रशासनाने सिंधरी रोडवरील मेनन आटा कारखान्यात अवैध रुपात साठवणूक केलेली युरिया आणि साखरेची पोती जप्त केली आहेत. साठेबाजी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून गव्हाची साठेबाजी केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी मंगळवारी आणखी दोन आटा चक्की आणि एका खासगी गोदामाला सील ठोकले.
मिरपूरखासचे उपायुक्त जैनुल आबेदीन मेमन यांनी हुसैन बख्श मर्री तालुक्याचे सहायक आयुक्त, यूनुस रिंद, पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसोबत काही दिवसांपूर्वी मिळालेल्या गोपनिय माहितीनंतर आटा चक्कीवर छापेमारी केली होती. येथे साखर आणि धान्याची सहा ते सात हजार पोती सापडली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी साठेबाजीविरोधात संबंधीत कायद्यांतर्गत कारवाई केली आणि २,००,००० रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर गोदाम सील करण्यात आले आहे. त्यांनी पोत्यांची मोजणी सुरू केली. मात्र, गोदाम खचाखच भरलेले असल्याने या कामात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पोती घेवून जाण्यासाठी जागा नसल्यानेही अडचणी निर्माण झाल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खास करुन बचत बाजाराच्या माध्यमातून जनतेला ९० रुपये प्रती किलो दराने साखर वितरीत करण्यासाठी तालुका स्तरावर साखरेच्या पोत्यांचा लिलाव करण्यात येत आहे. ते म्हणाले की, लिलावाच्या माध्यमातून कमी किमतीवर साखर उपलब्ध करुन दिली जाईल.