डेहराडून स्थित भारतीय पेट्रोलियम संस्थेच्या वतीने 13 ते 19 एप्रिल या कालावधीत ‘वन वीक वन लॅब’ (ओडब्ल्यूओएल ) मोहिमेचे आयोजन

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर ) प्रमुख संशोधन प्रयोगशाळांपैकी एक असलेल्या डेहराडूनस्थित भारतीय पेट्रोलियम संस्थेच्या वतीने 13 ते 19 एप्रिल या कालावधीत ‘वन वीक वन लॅब’ म्हणजेच ‘एक सप्ताह एक प्रयोगशाळा’ (ओ डब्ल्यूओएल ) या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे 13 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभ आणि पूर्व कार्यक्रमांसह सुरू होणाऱ्या या आठवडाभराच्या मोहिमेदरम्यान विविध संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

14 एप्रिल रोजी डेहराडून येथील परिसरात साजऱ्या होणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – भारतीय पेट्रोलियम संस्थेच्या (सीएसआयआर -आयआयपी) 64 व्या स्थापना दिनासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे.

कल्पना सुचवण्यापासून ते उद्योगामध्ये त्यांच्या अंमलबजावणीपर्यंतच्या या संस्थेच्या तंत्रज्ञानाचा विकासात्मक प्रवास दाखवण्यासाठी त्याच दिवशी संबंधितांची बैठकही संस्थेने आयोजित केली आहे. भारतीय उद्योगाचे नवीन दृष्टीकोन आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – भारतीय पेट्रोलियम संस्थेकडून त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यावरही या कार्यक्रमाचा भर असेल.

डेहराडून स्थित भारतीय पेट्रोलियम संस्थेच्या या कार्यक्रमात (अ) इंधन चाचणी प्रयोगशाळा, (ब) उदयोन्मुख प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच (क ) डी 4-मिथेनॉल प्रात्यक्षिक संयंत्राची पायाभरणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 15 एप्रिल रोजी ‘जिज्ञासा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील तरुण आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांपर्यंतही संस्था पोहोचेल. यावेळी विद्यार्थी सीएसआयआर -आयआयपी मधील शास्त्रज्ञ आणि संशोधन तज्ज्ञ संवाद साधतील.

या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन सीएसआयआर -आयआयपीमधून प्रशिक्षित आणि संबंधित उद्योगातील व्यक्तींसोबत तेल आणि वायू उद्योगातील आव्हाने आणि संधी तसेच स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेसाठी भविष्यातील संशोधन पद्धतींवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल.सीएसआयआर -आयआयपी संस्था ही राजाजी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे आणि आणि चहाच्या विस्तीर्ण बागेसह आजूबाजूचा परिसर हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे. संस्थेचा परिसर पक्षी आणि फुलपाखरांच्या 100 हून अधिक प्रजातींचे निवासस्थान आहे.

16 एप्रिल रोजी नेचर वॉक @ सीएसआयआर -आयआयपीचे आयोजन करण्यात आले आहे. हे सहभागींना निसर्गाशी एकरूप होण्याची आणि नैसर्गीक सौंदर्याचा आनंद घेण्याची एक उत्कृष्ट संधी प्रदान करेल. त्यानंतर, सीएसआयआर -आयआयपी परिसरात जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण कार्यक्रम सुरू केले जातील.17 एप्रिल रोजी भारत आणि उद्योगांमध्ये शाश्वत हवाई वाहतूक या विषयावर एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाश्वत इंधनाच्या DILSAAF™ ब्रँड सुरु करण्यावर लक्ष केंद्रित करून, त्यानंतर विशिष्ट तांत्रिक आव्हानांवर मात करण्यासाठी सीएसआयआर –आयआयपी आणि विविध उद्योग भागीदार यांच्यातील सहयोगी घडामोडींवर चर्चा करण्यात येणार आहे.

एमएसएमई भागीदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने संस्थेचे आंतर सीएसआयआर सहयोगी संशोधन प्रदर्शित करण्यासाठी 18 एप्रिल 2023 रोजी एमएसएमई संमेलन आणि संपूर्ण सीएसआयआर – सहयोग कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

उत्तराखंडच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तराखंड राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सीएसआयआर-आयआयपीने देऊ केलेल्या सहकार्यावर सविस्तर विचारमंथन करून 19 एप्रिल रोजी या मोहिमेचा समारोप समारंभ होईल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here