हवामान बदल: पंतप्रधान मोदी यांच्याकडून सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित

नवी दिल्ली : हवामान बदलाविरोधातील लढाईत लोकांच्या सामूहिक भागिदारी आणि संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानांनी शुक्रवारी जागतिक बँकेच्यावतीने आयोजित ‘मेकिंग इट पर्सनल : हाउ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’ या विषयावर आयोजित परिषदेत भारताचा दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की, हवामान बदलासाठीचा सर्वात शक्तीशाली उपाय म्हणजे व्यवहार परिवर्तन आहे. त्याची सुरुवात प्रत्येक घरापासून झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकांद्वारे आयोजित या परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हवामान बदलाशी आपण केवळ कॉन्फरन्स रुममध्ये टेबलवर बसून लढू शकत नाही. तर ही लढाई प्रत्येक घरातून लढली गेली पाहिजे. कोणताही विचार जेव्हा आंदोलन बनतो, तेव्हा तो सर्वत्र पोहोचतो. पंतप्रधानांनी लाइफ मिशन अंतर्गत व्हर्च्युअल रुपात मुख्य भाषण देताना जगभरातील नेत्यांना सांगितले की, आपल्या घर, कुटूंबामध्ये याविषयी जागृती करण्याची गरज आहे. तरच आपण यामध्ये यशस्वी होवू शकतो.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस आणि पंतप्रधानांनी सुरू केलेल्या मिशन लाईफचा हवाला देवून मोदी म्हणाले की, या कार्यक्रमाचा उद्देश हवामान बदलांविरोधात मोहिमेत लढाईसाठी नोंदणी करण्याचा आहे. जेव्हा लोक याबद्दल सजग होतील, तेव्हा त्यांच्या रोजच्या जगण्याच्या लढाईतील छोट्या-छोट्या बाबीबी खूप महत्त्वाच्या ठरतील. त्याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. पंतप्रधान मोदी यांच्या या टिप्पणीने ऊर्जा, पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत भविष्यातील नव्या आव्हानांबाबत जागतिक नेत्यांना एकत्र आणले आहे. त्यांनी भारतीय लोकांनी केलेल्या प्रयत्नांची उदाहरणासह मांडणी केली.

यावेळी जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हीड मालापास उपस्थित होते. ते म्हणाले की, भारताचे समाज आणि पर्यावरणादरम्यान सजगता आणण्याचे प्रयत्न खूप चांगले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या मांडणी ऐकून खूप बरे वाटले. याबाबत मालापास यांनी ट्वीटही केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here