हैदराबाद : पूर्वोत्तर क्षेत्रातील पर्यटन, संस्कृती आणि विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्य सरकारवर निजाम साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या स्वतःच्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, मु्ख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निजाम साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नऊ वर्षे उलटली तरी अद्याप याविषयी सरकारने काहीच केलेले नाही.
रविवारी एका पत्रकार परिषदेत मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांत सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स पुनर्जिवितकरण्याची घोषणा केली होती. मात्र, आतापर्यंत असे करण्यात ते अपयशी ठरले आहेत. रेड्डी यांनी आरोप केला की, राज्य सरकार प्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी मोदी सरकारवर टीका करीत आहे. मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत रुपात अनेकवेळा पत्र लिहिल्यानंतरही राज्य सरकार विकास कार्यक्रमांबाबत केंद्रासोबत सहकार्य करत नाही, असा आरोप त्यांनी केला.