नेल्लोर : राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली आली नसल्याने कोवूर सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विविध घटकांच्या पाठपुराव्यानंतर स्थानिक आमदारांनी कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले असले तरी याबाबत कोणतेही ठोस प्रस्ताव अथवा उपाययोजना करण्यात आलेली नाही.
२०१३ मध्ये कोवूर साखर कारखाना बंद झाल्यानंतर कोवूर, विदावलुरू, कोडावलुरू, इंदुकुरुपेटा, बुची रेड्डी पलेम, नेल्लोर, थोटापल्ली गुदुर आणि वेंकटचलम विभागातील जवळपास १०,००० हून अधिक शेतकरी आपले पिक खासगी कंपन्यांना विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. फेब्रुवारी १९७९ मध्ये पोथिरेड्डीपाडू गावात स्थापन झालेल्या कोवूर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने स्थानिक शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे जवळपास पाच विभागात ऊस उत्पादनात मोठी वाढ दिसून आली होती.
अतिरिक्त उत्पादनामुळे कारखान्याने २००१ मध्ये आपल्या गाळप क्षमतेला १२५० पासून २५०० टन प्रतीदिन पर्यंत वाढवले. २००२ ते २००५ या कालावधीत बहुतांश शेतकऱ्यांनी स्वतःला उसापासून दूर केले आणि इतर पिकांकडे मोर्चा वळवला. त्यामुळे पुढे काही कालावधीनंतर कारखाना बंद करावा लागला. यामुळे ६० कायमस्वरुपी आणि ६२ हंगामी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय बिकट परिस्थिती ओढवली. ते अद्यापही कारखाना सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. २००५ मध्ये कारखान्याच्या कामगारांनी आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी कारखान्याचे पुनरुज्जीवन केले होते.