एकिकडे राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विज कोसळण्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तापमान आणखी दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने वाढत असल्याचे अनुमान व्यक्त केले आहे. विदर्भात पुढील दोन दिवस तापमानवाढीचे परिणाम जाणवतील असे राज्याच्या विविध विभागांतील हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात हवामान सतत बदलत आहे. एकीकडे सुर्याच्या झळांनी वातावरण तापले असताना अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पिकांना मोठा झटका बसला आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मोठ्या संख्येने पिकांचे नुकसान झाले आहे. आंबा, केळी, द्राक्षे, संत्री या बागायतींना मोठा झटका बसला आहे. दुसरीकडे गहू, ज्वारी, मक्का, हरभरा, भाजीपाला यांचेही नुकसान झाले आहे. राज्यातील नागरिकांना सकाळी उकाडा आणि रात्री पावसाचा सामना करावा लागत आहे. पावसासोबतच तापमान वाढीच्या इशाऱ्याने आधीच संकटात असलेले शेतकरी त्रस्त झाले आहेत. नागपूर वेधशाळेने विदर्भात तापमान वाढ होईल असे म्हटले आहे. नागपूर शहराचे तापमान ४० डिग्रीपर्यंत वाढेल. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.