वर्ष 2030 पर्यंत देशातील एकूण इंधनमिश्रणातील वायूचा वाटा 15 टक्क्यापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे: केंद्रिय मंत्री हरदीप सिंह पुरी

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी जैव इंधनाचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या गरजेवर भर दिला आहे. ते म्हणाले की जीवाश्म इंधनाच्या आयातीचे प्रमाण कमी करण्यात जैव इंधनाची महत्त्वाची भूमिका असेल आणि त्यातून संपूर्ण शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यात मदत होईल.नवी दिल्ली येथे कॉम्प्रेस्ड बायोगॅस या विषयावरील जागतिक परिषदेला ते आज संबोधित करत होते. भारतीय हरित उर्जा महासंघाने (आयएफजीई)या परिषदेचे आयोजन केले आहे.

पर्यायी इंधनांच्या गरजेवर भर देत, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले, “जीवाश्म इंधनाची मर्यादित देशांतर्गत उपलब्धता आणि या इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व लक्षात घेता, जोपर्यंत जीवाश्म इंधनाला पर्याय किंवा पूरक ठरणारी स्वदेशी, शाश्वत, नवीकरणीय कच्च्या मालावर आधारित पर्यायी इंधने विकसित होत नाहीत तोवर आपल्या देशाची उर्जा सुरक्षा असुरक्षित असेल.”

केंद्रीय मंत्री म्हणाले की, कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या उत्पादनाचे विविध फायदे असणार आहेत, उदा. नैसर्गिक वायूच्या आयातीत घट, हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात घट, शेतातील अवशेष जाळण्याच्या प्रमाणात घट, शेतकऱ्यांना मोबदल्याच्या रुपात उत्पन्न मिळण्यास सुरुवात, रोजगार निर्मिती, परिणामकारक कचरा व्यवस्थापन इत्यादी. ते पुढे म्हणाले, “भारत सरकारने देशाला वायू-आधारित अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाने देशाच्या इंधन मिश्रणातील वायूचा वाटा वर्ष 2030 पर्यंत 15 टक्क्यापर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सध्या, आपण देशातील नैसर्गिक वायूच्या एकूण गरजेपैकी सुमारे 50% आयात वायू वापरत आहोत. कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या उत्पादनाच्या जलद विस्तारामुळे आपली वायूची अतिरिक्त गरज देशांतर्गत स्रोतांमधून पूर्ण होईल.”

सरकारच्या धोरणांमुळे देशाला गेल्या 10 वर्षांत हरित, नवीकरणीय उर्जेच्या वापर करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ‘किफायतशीर वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय’ (सतत) या योजनेचा तसेच कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या उत्पादनासाठी शेतीमधील कचऱ्याचा वापर करण्याबद्दल विशेषत्वाने उल्लेख केला.

हरित आणि स्वच्छ उर्जेचे महत्त्व सांगताना, केंद्रीय मंत्री पुरी यांनी नवीकरणीय, शाश्वत आणि स्वदेशी उर्जा स्त्रोतांच्या निर्मितीच्या गरजेवर भर दिला.हे स्त्रोत काही काळासाठी इतर पारंपरिक उर्जा स्त्रोतांना पूरक ठरू शकतील आणि दीर्घ काळाचा विचार करता उर्जेचे प्रमुख स्त्रोत म्हणून पुढे येऊ शकतील असे ते म्हणाले.

हरित उर्जेच्या स्वीकारासाठी, विशेषतः कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यात विविध राज्यांनी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसेच कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या वापराला अधिक चालना देण्यासाठी उचललेल्या पावलांबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. देशाच्या उर्जा विषयक मिश्रणाला चालना देण्यात आणि येत्या बऱ्याच काळासाठी भारताच्या उर्जा सुरक्षेला अधिक बळकट करण्यात या उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असेल असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here