महाराष्ट्र: सरकार ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान योजना महाडिबीटी पोर्टलद्वारे राबविणार

पुणे : कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतंर्गत सुरू असलेली सतोडणी यंत्र अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये साखर कारखाने गटांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा २१ एप्रिलपासून सुरु होत असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. २०२३-२४ या वर्षासाठीच्या या योजनेत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी, वैयक्तिक व्यावसायिकांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने प्रक्रियेनुसार अर्ज करण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले.

सरकार २० मार्च २०२३ च्या निर्णयान्वये ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्थांना अनुदान उपलब्ध करुन देत आहे. ऊस तोडणी मशिनसाठी किंमतीच्या ४० टक्के किंवा जास्तीत जास्त ३५ लाख रुपये अनुदान आहे. योजनेसाठी केंद्र सरकारचे १९२ कोटी आणि राज्य सरकारचे १०८ कोटी असे एकूण ३०० कोटी रुपये अनुदान यंदासाठी दिले जाणार आहे.

दैनिक पुढारीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले की, यासाठी https://mahadbtmaharashtra.gov.in/Farmer/login/login या महाडीबीटी पोर्टलच्या वेबसाइटवर याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या योजनांसाठी ही एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे ऊस तोडणी यंत्र निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पध्दतीने निवड केली जाईल. योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता राखली जाईल.

शेतकऱ्यांनी संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून या वेबसाईटवर अर्ज करावेत. अर्ज करताना अनुदानासाठी वैयक्तिक लाभार्थी/उद्योजक व शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, साखर कारखाने असे पर्याय उपलब्ध असतील. पर्याय निवडल्यानंतर महा-डीबीटी पोर्टलवर अर्जाबाबत माहिती देण्यात आली आहे. पोर्टलवर अर्जदारांना २३ रुपये ६० पैसे शुल्क भरावे लागेल. याबाबत काही माहिती अथवा अडचणीबाबत पोर्टलवर तक्रार, सूचना नोंदविण्याची सोय आहे असेही गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here