पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी साखर साठेबाजांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणालाही जीवनावश्यक वस्तू, खास करुन साखरेच्या किमतींमध्ये अचानक वाढ करून गैरफायदा घेण्याची संधी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे.
पंतप्रधानांनी शुक्रवारी लाहोरमध्ये साखरेच्या किमती बाबत बैठक आणि साखर तस्करी, साठेबाजीला आळा घालण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून हे निर्देश दिले.
पंतप्रधान म्हणाले की, साखरेची तस्करी आणि साखरेची कृत्रीम टंचाई निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. त्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा मंत्रालयाला निर्देश दिले की, साखरेचा एक्स मील दर निश्चित करताना पारदर्शक प्रक्रियेत सर्व हितधारकांना सहभागी करून घ्यावे. ते म्हणाले, की, जप्त साखरेचा साठा स्वस्त दरात ग्राहकांसाठी विक्री करण्यासाठी उपलब्ध करुन दिला जाईल.
बैठकीत साखरेची सध्याची एक्स मील किंमत, अन्न सुरक्षा मंत्रालयाद्वारे उपलब्ध करण्यात आलेली आकडेवारीनंतर उत्पादन खर्च आणि देशातील साखरेचा सध्याचा साठा याबाबत विस्ताराने माहिती देण्यात आली. बैठकीत साखर साठेबाजाराविरोधात सुरू असलेली कारवाई आणि साखर तस्करी रोखण्याच्या उपायांबाबत माहिती दिली.