भारतातील प्रमुख बंदरांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गाठले विक्रमी टप्पे, व्यापार आणि आर्थिक विकासाला दिली चालना: सर्बानंद सोनोवाल

भारतातील प्रमुख बंदरांनी आर्थिक वर्ष 23 मध्ये अभूतपूर्व कामगिरी नोंदवत विविध प्रमुख कामगिरी निर्देशकांमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीत फिक्कीने आयोजित केलेल्या बंदर पायाभूत सुविधेवरील दुसऱ्या परिषदेत सोनोवाल बोलत होते. प्रमुख बंदरांनी एकत्रितपणे विक्रमी 795 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली. यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 10.4% वाढ नोंदवली. या शिवाय, त्यांनी 17,239 टन प्रति दिवसाचे आतापर्यंतचे सर्वोच्च कामगिरी केली , गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 6% वाढ झाली असे त्यांनी नमूद केले. आत्तापर्यंतचे 48.54% इतके सर्वोत्तम कार्यान्वयन प्रमाण ही आणखी एक महत्त्वाची कामगिरी ठरली आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) 6 दशलक्ष टिईयू (20 फूट लांबीचे कंटेनर) हाताळून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रमुख बंदरांनी त्यांच्या आतापर्यंतच्या हाताळणी झालेल्या सर्वाधिक जहाजांची संख्या नोंदवली असून, वर्षभरात एकूण ती 21,846 वर पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौवहन उद्योगाने जहाजांच्या संख्येत, जहाजाची माल वाहून नेण्याची एकूण क्षमता आणि नोकरदार नाविकांमध्ये उल्लेखनीय वाढ केली आहे असे सोनोवाल यांनी नमूद केले. भारतीय ध्वजाखाली प्रवास करणाऱ्या जहाजांचा ताफा 2014 मधील 1,205 वरून 2023 मधे 1,526 पर्यंत वाढला आहे. त्यामुळे देशाची सागरी वर्चस्व बळकट करण्यासाठीची वचनबद्धता दिसून येते असे ते म्हणाले. या वाढीसह सकल मालवाहू क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे, 2014 मधील 10.3 दशलक्ष वरून 2023 मध्ये 13.7 दशलक्ष पर्यंत ती वाढली आहे. वाढलेली क्षमता आणि कार्यान्वयनाचे हे निदर्शक आहे. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, भारतीय खलाशांची संख्या 2014 मध्ये 1,17,090 होती. 2022 मध्ये त्यात उल्लेखनीय वाढ होत ती 2,50,071 झाली आहे. केवळ नऊ वर्षांत त्यात जवळपास 114% वाढ झाली आहे.

व्यापाराला चालना देणे, आर्थिक वाढीस पाठबळ देणे यासाठी बंदराच्या पायाभूत सुविधांचा विकास तसेच आधुनिकीकरण करण्याकरता भारताचे समर्पण या ऐतिहासिक यशामुळे अधोरेखित होते यावर सोनोवाल यांनी भर दिला.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, अत्याधुनिक बंदर पायाभूत सुविधा विकासातली भारताची प्रगती आणि सागरी क्षेत्रासाठी भविष्यातील योजनांची रूपरेषा तयार केली आहे. “भारताचा प्रमाणानुसार 95% आणि मूल्यानुसार 70% व्यापार सागरी वाहतुकीद्वारे केला जातो हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.सुरळीत आणि कार्यक्षम व्यापारासाठी, सर्वात आधुनिक आणि प्रगत बंदर पायाभूत सुविधांना खूप महत्त्व आहे असे ते म्हणाले.”

बंदरांच्या कार्यान्वयनात तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला, “स्मार्ट बंदरं ही भविष्य आहेत आणि आम्ही या ध्येयाच्या दिशेने आधीच लक्षणीय प्रगती करत आहोत असे ते म्हणाले.” हरित हायड्रोजनची हाताळणी, साठवणूक आणि वाहतुकीसाठी हायड्रोजन केन्द्र बनण्यासाठी प्रमुख बंदरे विकसित होत आहेत. दीनदयाळ, पारादीप आणि व्ही.ओ. चिदंबरनार बंदरांनी आधीच हायड्रोजन साठवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यास सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले.

फिक्कीच्या वाहतूक पायाभूत सुविधा समितीचे, बंदरे आणि नौवहन अध्यक्ष, ध्रुव कोटक यांनी शाश्वतता आणि हरित बंदरे उपक्रमांसाठी सरकारच्या वचनबद्धतेबद्दल कौतुक केले.

‘स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत बंदरे’ या विषयावर फिक्की – क्रिसिल प्रबंधाचे प्रकाशनही सोनोवाल यांनी केले.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here