देशभरातील अनेक राज्यात गहू खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्यापू्र्वी अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचा गहू खरेदी करण्यासाठी सरकारने निर्देश दिले आहेत. याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. गहू खरेदीची मानके शिथिल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्यमंत्री योगी यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, पावसामुळे खराब झालेल्या गव्हाची खरेदी करताना शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये कपात करू नये. शेतकऱ्यांना वेळेवर त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा केले जावे. खरेदीवेळी होणाऱ्या नुकसानीची भरपाई उत्तर प्रदेश सरकारकडून केली जाईल. उत्तर प्रदेश सरकारने या गहू खरेदीसाठी खास तरतुद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतींच्या सहयोगाने गहू खरेदी केली जाईल. याशिवाय राज्यात गव्हाची खरेदी केंद्रे वाढविण्यात आली आहेत. अवकाळी पावसाचा गव्हाच्या पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात पिक खराब झाले आहे. गव्हाच्या शेतीमध्ये उत्तर प्रदेश अग्रेसर आहे. त्यामुळे सरकारने १८ टक्क्यांपर्यंत खराब गव्हाचीही खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी हे प्रमाण सहा टक्के होते.