जी 20 परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत दिनांक 23 ते 25 मे 2023 या कालावधीत होणार

जी 20 परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत दिनांक 23 ते 25 मे 2023 या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच इतर विविध यंत्रणा करीत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेतली.

 

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांत मुंबईने केलेले कार्य देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर देखील नावाजले आहे. जी 20 परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाच्या नियोजित बैठकीच्या निमित्ताने ही कामगिरी जगासमोर अधोरेखित करण्याची संधी आहे. हे लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय राखून विहित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावेळी दिले.

 

मुंबईत जी 20 परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाच्या (Disaster Risk Reduction group) बैठकीला दिनांक 23 मे 2023 पासून प्रारंभ होणार आहे. सुमारे 120 पेक्षा अधिक सदस्य या बैठकीला हजर राहणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला कार्यगटाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. यामध्ये मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाचा अभ्यास दौरा करतील, महानगरपालिका इमारतीचा हेरिटेज वॉक या बाबी समाविष्ट असतील. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील भेटीच्या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालय इमारतीत सुरू असलेली कामे वेळीच पूर्ण करावीत, असेही आयुक्तांनी नमूद केले. त्यासोबतच सर्व यंत्रणांसोबत उत्तम समन्वय राखून इतरही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्त चहल यांनी दिले.

मे महिन्यात जी 20 परिषदेच्या एकूण तीन कार्यगटांची बैठक होत आहे. त्यामुळे या तीनही बैठकांच्या निमित्ताने सर्व संबंधित विभागांच्या हद्दीत रस्ते, स्वच्छता, सुशोभीकरण इत्यादींची कामे मागील बैठकांच्या वेळी असणारा अनुभव लक्षात घेवू पूर्ण करावीत. त्याबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा देखील पुढील आठवड्यात घेतला जाईल, असे आयुक्तांनी नमूद केले.

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार,केंद्र सरकारच्या जी 20 परिषदेच्या संचालक मृणालिनी श्रीवास्तव, पत्रसूचना कार्यालयाच्या (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनीदीपा मुखर्जी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त (परिमंडळ 4) विश्वास शंकरवार, उपआयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादार, उपआयुक्त (परिमंडळ 1) डॉ. संगीता हसनाळे, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजीत तावडे, पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) महेश चिमटे, राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलिंद हरदास यांच्यासह इतर विविध यंत्रणांचे प्रतिनिधीही या बैठकीस उपस्थित होते.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here