सोलापूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार यांनी या कारखान्याचे पुनरुज्जीवन कसे झाले याविषयी माहिती दिली. पवार यांनी यावेळी अभिजित पाटील यांच्या साखर कारखाने चालविण्यामागील धडपडीचे कौतुक केले.
शरद पवार म्हणाले की, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळप झालेल्या उसाला २,३०० रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. आणखी दोनशे रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक भाव देणारा कारखाना अशी या कारखान्याची ओळख असेल. पाटील यांनी धाडसाने आणि कष्टाने हा कारखाना चालवायचा निकाल घेतला. त्यांनी मला याबाबत माहिती दिली, तेव्हा मी त्यांना, कारखान्याची स्थिती आधी पाहून या असा सल्ला दिला. त्यांनी कारखाना पाहून दीपक साळुंखे यांच्याकडून कारखान्याची माहिती घेतली. कारखाना चालू शकतो असा विश्वास दाखवला. आज तो कारखाना १२ वर्षांनंतर चालू झाला आहे, असे शरद पवार म्हणाले.
पंढरपूरमधील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगर लिमिटेडमधील नव्या बायो सीएनजी प्रकल्पाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यास संबोधित केले.
या कारखान्याच्या आरंभापासून ते आजपर्यंत अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो आहे. देशाचे नेते स्व. यशवंतराव चव्हाण… pic.twitter.com/24Tw0rLTSP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 7, 2023
पवार म्हणाले की, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, औदुंबरअण्णा पाटील आदींनी साखर कारखानदारी नव्याने सुरू केली. मात्र, अभिजित पाटील यांनी बंद पडलेल्या कारखान्याचे पुनरुज्जीवन केले. मोडकळीस आलेले साखर कारखाने सुरू करण्याची नेतृत्वशैली त्यांनी विकसित केली आहे, असे पवार म्हणाले.