पाकला आयएमएफकडून झटका, अटींचे पालन केल्याचा दावा फेटाळला

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. महागाईच्या झटक्याने सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी झगडावे लागत आहे. आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या देशाला मदतीसाठी सर्वत्र हात पसरावे लागत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे लक्ष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मदतीकडे लागले आहे. मात्र, आयएमएफने आता पाकिस्तानचे दावे खोडून काढले आहेत. मदतनिधी मिळावा यासाठी आयएमएफच्या सर्व अटी मंजूर असल्याचे पाकिस्तानने सांगितले होते. मात्र, वास्तव वेगळेच आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या पाकिस्तानला आयएमएफने मोठा झटका दिला आहे. मदत निधी देण्यासाठी आयएमएफने पाकिस्तानसमोर काही कठोर अटी ठेवल्या होत्या. त्या सर्व अटींचे पालन केले असल्याचा दावा पाक सरकारने आयएमएफकडे केला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अर्थमंत्री इशाक डार यांनी असे दावे केले होते. मात्र, द ट्रिब्यून एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमएफने आपल्या नवव्या औपचारिक आढाव्यात पाक सरकारचे दावे फेटाळले आहेत. त्यामुळे आयएमएफकडून मिळणाऱ्या १.१ अब्ज डॉलरच्या पॅकेजच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here