हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सहारनपूर : चीनी मंडी
गांगनौली साखर कारखान्यातून साखर घेऊन जाणारा ट्रक लुटणाऱ्या पेटी गँगच्या तीन संशयित गुन्हेगारांना पोलिस आणि क्राइम ब्रँचने सापळा रचून पकडले. पकडलेल्यांपैकी दोघा संशयितांवर प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तीन महिन्यांपूर्वी पेटी गँगच्या नऊ गुंडांनी हा ट्रक पळवला होता. पोलिसांनी संशयितांकडून साखरेची १५ पोती, तीन रिव्हॉल्वर, काडतूस, मोबाइल फोन आणि ट्रकची कागदपत्रे जप्त केली.
याबाबत एसपी देहात विद्यासागर मिश्र यांनी सांगितले की, क्राइम ब्रँच आणि नागल पोलिस ठाण्याला खबऱ्यांकडून या संशयितांबद्दल माहिती मिळाली होती. पोलिसांनी नागल परिसरातील सोसायटीनजीक सापळा रचला. संशयितांनी पोलिसांवर गोळीबार करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल कारवाई करत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.
पकडलेल्या संशयितांपैकी खालिद आणि नसीम उर्फ मोटा (रा. नूनाबडी, बडगावस सहारनपूर) यांच्यावर प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते असे एसपी देहात यांनी सांगितले. पकडण्यात आलेला तिसरा आरोपी इंतजार हा झिंझाना परिसरातील चौसाना गावचा रहिवासी आहे. संशयितांजवळून साखरेने भरलेली १५ पोती, १३ रिकामी पोती, तीन रिव्हॉल्व्हर, काडतूस, मोबाइल फोन आणि ट्रकची कागदपत्रे सापडली.
उत्तराखंडमध्ये विकली साखर
एसपी देहात यांनी सांगितले की तीनशे पोती साखरेने भरलेला ट्रक लुटण्यास पेटी गँगचे नऊ संशयित सहभागी होते. पकडलेल्या तीन आरोपींशिवाय सावेज अस्लम, जावेद ताहिर, ममरेज अस्लम, फारूख रमजानी (रा. नूनाबडी), लुकमान इस्लाम (थीथकी), ताहिर इकबाल (खिवाई) हे आरोपीही सहभागी होते. यांच्यापैकी ममरेज, फारुख आणि जावेद यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अन्य एका प्रकरणात अटक करून कोठडीत पाठवले होते. ट्रक पळवल्यानंतर संशयितांनी यातील साखरेची काही पोती नागल परिसरात उतरवली होती. उर्वरीत
साखर लुकमान, ताहिर आणि सावेज उत्तराखंडमधील बहादराबादला घेऊन गेले. तेथे त्यांनी साखरेची विक्री केली. ट्रक पळविल्यानंतर संशयितांनी ट्रक चालकाला आणि त्याच्या सहकाऱ्याला बांधून शेतात फेकून दिले होते.
पेटी गँग नेहमीच हत्यारबंद
एसपी देहात यांनी सांगितले की पेटी गँगचे सदस्य नेहमी हत्यारबंद असतात. कंबरेला काडतुसांची पट्टी बांधूनच ते नेहमी वावरायचे. जर कधी पोलिसांशी चकमक उडाली तर सावधगीरी म्हणून ते हत्यार जवळ बाळगायचे. लुटमार करण्यापूर्वी स्वत:च्या गाड्यांना ते जवळच्या जंगलात सुरक्षित ठिकाणी ठेवायचे. लुटमार केल्यानंतर एक ते दोघेजण लुटीचा माल घेऊन निघून जायचे. बाकीचे स्वत:च्या वाहनांचा वापर करून पोलिसांची नाकाबंदी संपल्यानंतर तेथून निसटायचे अशी त्यांची कार्यपद्धती आहे.
खालिदवर चोरी, लुटमारीचे आणखी गुन्हे
पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी खालिदवर लुट, चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत, हरियाणा येथील झबरेडा येथील लुटीचे दोन गुन्हे, सहारनपूर येथील कोतवाली नगर आणि नानौता, देवबंद येथील एक गुन्हा नोंद आहे. आरोपी नसीम याच्याविरोधात सहारनपूर कोतलावी नगरातील चोरीचा गुन्हा दाखल आहे.