देशातील बँकांमध्ये पडून असलेल्या हजारो कोटी रुपयांची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांची निर्गत लावण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आता १०० डेज १०० पे असे अभियान राबविणार आहे. या अंतर्गत १०० दिवसांत भारतातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेंमध्ये जमा असलेल्या १०० अनक्लेम्ड डिपॉझिट रकमेची माहिती घेतली जाईल. त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. आरबीआयने सांगितले की, अशा प्रकारचे अभियान राबवून बँकिंग सिस्टीममध्ये जमा असलेली बेवारस रक्कम कमी केली जाईल. आणि ती त्यांच्या योग्य मालकांपर्यंत पोहोचवली जाईल.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अशी अनक्लेम्ड डिपॉझिटची रक्कम जवळपास ३५,००० कोटी रुपये आहे. ज्या बँक खात्यांमधील पैसे १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळापासून पडून आहेत, त्या खात्यांमध्ये जर एकही ट्रॅन्झॅक्शन झाले नसेल तर ते इनअॅक्टिव्ह डिपॉझिट मानले जाते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये अशी ३५००० कोटींची रक्कम आरबीआयला ट्रान्सफर केली होती. ही रक्कम वेगवेगळ्या बँकांच्या १०.२४ कोटी खात्यांशी संबंधीत होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलिकडेच फायनान्शिअल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउंन्सिल (FSDC) च्या बैठकीत यासाठी एक विशेष अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते.