पुणे / कोल्हापुर / सांगली / : चीनी मंडी
राज्याच्या ऊस पट्ट्यात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी किडीच्या प्रादुर्भावाने हैरान झाला आहे. लष्कर अळी, चाबूककाणी आणि हुमणीच्या तडाख्यात पुण्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील हजारो एकर शेती सापडली आहे. किडीचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा फटका ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी शेतकरी, कृषी विभाग आणि साखर कारखान्यांनी कंबर कसली आहे.
पुण्यात हुमणीचा प्रादुर्भाव…
गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या काळात उसावर हुमणीचा प्रादुर्भाव हमखास पाहायला मिळत आहे. हुमणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. नुकसान टाळण्यासाठी शेतकरी नवनवे पर्याय शोधत आहेत. पुणे जिल्ह्यातील तब्बल ९०० पेक्षा जास्त गावात हुमणीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उसाच्या शेतात ७८०० लाईट ट्रैप लावण्यात आले आहेत. या लाईट ट्रैपमध्ये आतापर्यंत दोन हजार किलोपेक्षा जास हुमणीच्या अळ्या पकडण्यात यश आले आहे. त्यातून काही प्रमाणात उसाचे नुकसान वाचविण्यात यश आले आहे. साधारणपणे जून आणि जुलै महिन्यात कमी पावसानंतर हुमणीचा वेगाने फैलाव होतो. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात हुमणीचा जास्त शिरकाव झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लष्करी अळीचा शिरकाव…
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडसह अन्य काही तालुक्यात लष्करी अळीने शिरकाव केला आहे. रातोरात लष्करी अळी उभे पीक फस्त करत आहे. लष्करी अळीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. सध्या कीड प्राथमिक टप्प्यात असल्याने त्याचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. जिल्ह्यातील करवीर, कागल, आजरा तालुक्यातही काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
सांगलीमध्ये चाबूककाणीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर…
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका परिसरात चाबूककाणी रोगाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव लागणीपेक्षा खोडवा पिकावर जास्त होतो. उसाच्या शेंड्यामधून लांब चाबकासारखा पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यातील काळी पावडर म्हणजेच या रोगाचे बीज. या बीजाचा बेणे आणि हवेवाटे वेगाने प्रसार होतो. विशेष म्हणजे या रोगाची पाच टक्क्यांपेक्षा जास्त लागण झाल्यास पीक काढून टाकावे लागते. शिवाय पुन्हा एक वर्ष त्या शेतात उसाचे पीक घेऊ नये, असे तज्ञाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता…
राज्यात सर्वात जास्त उसाचे उत्पादन पश्चिम महाराष्ट्र होते. यंदा कमी ऊस उत्पादनामुळे हंगाम लवकर आटोपला आहे. असे असले तरी महाराष्ट्राने ३० एप्रिलपर्यंत देशात सर्वाधिक १०५.३ मिलियन टन साखरेचे उत्पादन केले आहे. मात्र ऊस आणि साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. त्यातच आता उसावर लष्करी अळी, तांबेरा, पक्का बोईंग, चाबूककाणी, हुमणी अशा किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्याचा फटका आगामी गाळप हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.