मंड्या : हजारो शेतकऱ्यांची ऊस शेती ज्या धरणांवर अवलंबून आहे, त्या कृष्णराजस (केआरएस) धरणाचा जलस्तर ८२.९४ फूट नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत जलस्तर १०४.८ फूट होता. द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केआरएसला ३८८ क्युसेक पाणी मिळत आहे. तर मंगळवारी ४,००२ क्युसेक पाणी धरणातून सोडण्यात येत आहे. जसजसा धरणातील जलस्तर घटत आहे, तसतसा बेंगळुरू आणि म्हैसूरमध्ये पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर अधिक लक्ष दिले जात आहे.
मुख्य पाण्याचे ठिकाण असल्याने कोडागूमध्ये मे अखेरपर्यंत ३६० मिमी पावसासह एकूण २,८४० मिमी पाऊस कोसळतो. मात्र, आतापर्यंत केवळ १५७ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे हा फक्त म्हैसूरच नव्हे तर बेंगळुरूसाठी चिंतेचा विषय बनला आहे. ही ठिकाणे केआरएस धरणावर अवलंबून आहेत.
यादरम्यान, केआरएस धरणाच्या इंजिनीअर्सनी सांगितले की, सध्याची परिस्थिती खराब नाही. कारण, आमच्याकडे म्हैसूर आणि बेंगळुरूला पुरवठा करण्याइतके पुरेसे पाणी धरणात आहे. सद्यस्थितीत म्हैसूर शहराला, होंगळ्ळी, मेलापुरा आणि बेलगोला येथील तीन प्रमुख पंपिंग स्टेशनमधून जवळपास २४० एमएलडी आणि काबिनी नदीमधून जवळपास ६० एमएलडी पाणी मिळते. केआरएस जलाशयामधून दररोज म्हैसूरसाठी १०० क्युसेक पाणी वापरले जाते.
टीओआयसोबत बोलताना महापौर शिवकुमार म्हणाले की, म्हैसूरला जून अखेरपर्यंत पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार नाही. ते म्हणाले, आम्ही जून महिन्यात पावसाची अपेक्षा करीत आहोत. त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही. याशिवाय, लोकांनी रस्ते सफाई तसेच आपल्या गाड्या धुण्यासाठी पाणी फुकट घालवण्याऐवजी पाण्याचा वापर सतर्कतेने केला पाहिजे.
कर्नाटक राज्य रयत संघाचे मंड्या जिल्हाध्यक्ष केम्पेगौडा यांनी पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे आधीच नुकसान होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आधीच आम्ही नुकसान सोसत आहोत. कारण, आम्हाला पिकांपासून कोणताही नफा मिळत नाही. जर पुढील काही आठवड्यात पाऊस झाला नाही, तर आमची स्थिती आणखी खराब होईल. ऊस आणि भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागेल.