मनीला : देशातील २४ साखर कारखान्यांपैकी केवळ ११ कारखाने अद्याप गाळप करीत आहेत. त्यामुळे देशाला आणखी साखर आयात करावी लागेल, असे Sugar Regulatory Administration (SRA) ने म्हटले आहे. साखर उद्योगाचे मुख्य नियामक पाब्लो लुइस अजकोना यांच्या म्हणण्यानुसार, केवळ अनुमानीत मागणी पूर्ण करण्यासाठी आयात केली जाईल. त्यांनी सांगितले की, देशातील कारखाने मे अखेरपर्यंत आपले कामकाज बंद करतील. कारण त्यांनी गेल्यावर्षी पुरवठ्यातील तुट भरून काढण्यासाठी लवकर गाळप सुरू केले होते. मात्र, एसआरएला जास्तीत जास्त १,५०,००० मेट्रिक टन (MT) साखर आयातीला परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे.
अजकोना म्हणाले की, आता या महिन्याच्या अखेरपर्यंत बाहेरून खरेदी केल्या जाणाऱ्या साखरेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी साखर कारखान्यांकडून आकडेवारी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते म्हणाले की, आधीच १,००,००० मेट्रिक टन अतिरिक्त साखर बफर स्टॉकमध्ये शिल्लक असेल.
SRA च्या नव्या अनुमानानुसार, स्थानिक उत्पादनाची आकडेवारी १.७६ मिलियन मेट्रिक टन असेल आणि आता जे कारखाने सुरू आहेत, त्यापासून २०,००० मेट्रिक टनाची भर पडू शकेल. तरीही हा आकडा २.२ मिलियन मेट्रिक टन या अनुमानीत देशांतर्गत मागणीच्या तुलनेत खूप कमी आहे. अजकोना यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अतिरिक्त साखर आवक, पिक हंगाम सुरू होण्यापूर्वी अपेक्षित आहे. त्यातून देशांतर्गत साखरेच्या किमती P८० ते P९० प्रती किलोपर्यंत कमी होऊ शकतील. मेट्रो मनीला बाजारांमध्ये रिफाइंड साखरेची किरकोळ किंमत P८६ ते P११० प्रती किलो झाली आहे. एक वर्षापूर्वीच्या P७० प्रती किलो या दरापेक्षा ती अधिक आहे.