शामली: धरणे आंदोलन टाळण्याचे आवाहन करण्यासाठी भैसवाल गावात गेलेल्या अपर दोआब साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी चार तास ओलीस ठेवले. शेतकऱ्यांनी या हंगामातील संपूर्ण ऊस बिले त्वरीत देण्याची मागणी केली. चार तास अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्यात आले. यादरम्यान साखर कारखाना आणि ऊस विभागाचे अधिकारी घटनास्थळी वेळेवर पोहोचले नव्हते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, १३ दिवसांपूर्वी अपर दोआब साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. मात्र, कारखान्याने २२ नोव्हेंबरपर्यंत पुरवठा झालेल्या उसाचे बिल दिले आहे. थकीत बिले देण्याच्या मागणीसाठी भैसवाल गावातील शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन केले. कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी भेटले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी २६ मेपासून आंदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी कारखान्याचे एजीएम दीपक राणा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व मालकांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.
गुरुवारी सायंकाळी एजीएम नरेश कुमार व सहकारी कंवरपाल हे भैसवाल गावात शेतकऱ्यांशी चर्चेसाठी गेले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना ओलीस ठेवले. जवळपास आठ वाजेपर्यंत या अधिकाऱ्यांना रोखण्यात आले. दरमहा २० कोटी रुपयांची थकबाकी देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांनी फेटाळले आहे. प्रॉडक्शन मॅनेजर सुशील चौधरी यांनी फोनवरून शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले. यावेळी शेतकरी उधम सिंह, जगमेहर, अनिरुद्ध, राजेंद्र, विकास, यांसह इतर उपस्थित होते.