आतापर्यंत बाजारात विविध ब्रँडेड कंपन्यांकडून पॅकिंग केलेल्या आट्याची विक्री केली जात होती. मात्र, आता पहिल्यांदाच देशात ब्रँडेड गव्हाची उपलब्धता होईल. हा गहू विविध व्हरायटीचा असेल. अदानी समुहाची एफएमसीजी कंपनी अदानी विल्मर ब्रँडेड गव्हाच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करीत आहे. कंपनीने फॉर्च्युन ब्रँडद्वारे बाजारात गव्हाची विक्री केली जाईल, अशी घोषणा केली.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार अदानी विल्मरने शुक्रवारी याबाबत घोषणा केली. कंपनी फॉर्च्युन ब्रँडच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गव्हाची विक्री करेल. गव्हाच्या व्हरायटीमध्ये शरबती, पूर्णा १५४४, लोकवन, एपी ग्रेड १ यांचा समावेश असेल. सुरुवातीला दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये याची विक्री केली जाईल. गहू विक्रीच्या क्षेत्रात उतरणारी ही एकमेव कंपनी असल्याचा दावा अदानी विल्मरने केला आहे.
देशातील पश्चिम तसेच पूर्वोत्तर राज्यांमध्ये निवडक गव्हाचा वापर आट्यासाठी केला जातो. मात्र, आता फॉर्च्युनच्या माध्यमातून ग्राहकांना आणखी पर्याय मिळतील असे विल्मरचे मार्केटिंग अँड सेल्स असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट विनित विश्वंभरन यांनी सांगितले.