नवी दिल्ली : सिंगापूर येथील विल्मर शुगर होल्डिंगची सहाय्यक कंपनी श्री रेणुका शुगर्सचा मार्च २०२३ च्या तिमाहीतील निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या या तिमाहीच्या तुलनेत ७२.६१ टक्क्यांनी खालावून ४२.८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी, २०२२ च्या या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १५६.३ कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात समान कालावधीतील २,१७२ कोटी रुपये कामकाजापासून मिळणारा महसूल, ७.१६ टक्क्यांनी वाढून २,३२८.५ कोटी रुपये झाला आहे. गळीत हंगाम लवकरच बंद झाल्यानंतरही देशांतर्गत साखरेच्या किमतींमधील वाढ आणि इथेनॉल उत्पादनाद्वारे कंपनीने मजबूत कामगिरी केली आहे.
श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले की, देशांतर्गत मागणीतील वाढ, चांगली क्षमता याचा वापर आणि खास करुन साखर तसेच रिफायनरी व्यवसायातून महसूल वाढल्याने कंपनीने Q४ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. ते म्हणाले की, मार्च २०२३ मध्ये ७२० KLPD पासून १२५० KLPD पर्यंत विस्तारीत इथेनॉल उत्पादन क्षमतेचा पूर्णपणे लाभ पुढील आर्थिक वर्षात दिसून येईल अशी अपेक्षा आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर बीएसईवर ०.३९ टक्याच्या वाढीसह ४३.५२ रुपयांवर बंद झाला.