शामली: जलालाबाद थानाभवनचे आमदार अश्रफ अली खान यांनी सोमवारी लखनौमध्ये ऊस मंत्री लक्ष्मीनारायण यांची भेट घेऊन त्यांना थकीत ऊस बिलासंबंधीत समस्यांची माहिती दिली. यासोबतच त्यांनी आपल्या विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लखनौमध्ये सोमवारी ऊस मंत्री लक्ष्मीनारायण यांच्या भेटीदरम्यान थानाभवनचे आमदार अश्रफ अली खान यांनी सांगितले की, मतदारसंघातील शेतकऱ्यांना उसासंदर्भात प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले दिली जात नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. यापूर्वी अनेकदा कारखान्याचे अधिकारी आणि प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही.
जर साखर कारखान्याची अशीच भूमिका राहिली तर शेतकऱ्यांचे ऊस लागवडीतील स्वारस्य कमी होईल आणि कारखान्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. तर आमदार अश्रफ अली यांनी सांगितले की, या तक्रारीनंतर ऊस मंत्र्यांनी तातडीने ऊस विभागाचे सचिव संजय भुसरेड्डी आणि शामलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्नात लक्ष देण्याची सूचना केली. लवकरात लवकर शेतकऱ्यांना ऊस बिले दिली जातील, याचे नियोजन करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.