बिजनौर : वेळेवर ऊस बिले न देणाऱ्या बिलाई साखर कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. संतप्त शेतकरी गावांमध्ये ऊसाचा सर्व्हे करण्यास येणाऱ्या पथकांना परत पाठवत आहेत. गुरुवारी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सर्व्हे करण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांना मनाई केली. शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शेतातच थांबवून ठेवले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्याला ओलीस ठेवल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिली. घटनास्थळी आलेल्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मर्जीशिवाय सर्व्हे केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय किसान युनियन अराजकीयच्या आवाहनानंतर बिलाई साखर कारखाना क्षेत्रातील शेतकरी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना आपल्या शेतांमध्ये सर्व्हे करण्यास मनाई करीत आहेत. जोपर्यंत कारखाना उसाचे पैसे देत नाही, तोपर्यंत ऊस पुरवठा केला जाणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. इतर कारखान्यांना ऊस पाठवला जाईल आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऊसाचा सर्व्हे करू दिला जाईल, तसेच ऊस समितीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही सहकार्य करू असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाची पूर्वकल्पना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे भारतीय किसान युनियन अराजकीयचे जिल्हाध्यक्ष चौधरी नितिन सिरोही यांनी सांगितले. राजवीर सिंह, अजय सिंह, विरेंद्र सिंह, छोटू चौधरी, सचिन कुमार, सचिन चौधरी, प्रिन्स कुमार, रविश कुमार, भूपेंद्र सिंह आदी उपस्थित होते.