ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातात २८० जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ९०० जण गंभीर जखमी आहेत. या रेल्वेत चिक्कमंगळुरूतील ११० लोकांचा एक गटही होता. मात्र, हे सर्वजण सुरक्षित आहेत. सर्वजण हावडामार्गे झारखंडमधील सम्मेद शिखरजी यात्रेला निघाले होते. या प्रवासादरम्यान, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली.
आजतकमधील वृत्तानुसार, ओडिशातील बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वेगाड्यांदरम्यान भिषण अपघात झाला. यात २८० जणांना प्राण गमवावे लागले. या घटनेवेळी चेन्नईकडे निघालेली शालीमार चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली. त्यानंतर ही रेल्वे मालगाडीला धडकली. यादरम्यान, तिसऱ्या ट्रॅकवर समोरून येणारी बेंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस रुळावरून उतरून डब्यांना धडकली.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. याचे नेतृत्व दक्षिण पूर्व परिमंडळाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त करतील. भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, एसई सर्कलचे सीआरएस एएम चौधरी या अपघाताची चौकशी करतील. या मार्गावर कवच संरक्षण उपलब्ध नसल्याचेही प्रवक्त्याने सांगितले. या अपघातानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बालासोर येथे पोहोचल्या आहेत. त्यांनी अपघाताचा आढावा घेतला. अपघातग्रस्तांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा त्यांनी केली. हा राजकारणाचा विषय नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.