नवी दिल्ली : वर्ल्ड बँकेने पुन्हा एकदा जागतिक विकास दराचे अनुमान घटवले आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी आपल्या व्याजदरात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वर्ल्ड बँकेने २०२३ साठी जागतिक विकासदराचे अनुमान घटवून २.१ टक्क्यांवर आणले आहे. आपल्या अद्ययावत अनुमानात वर्ल्ड बँकेने म्हटले आहे की, २०२२ मध्ये जागतिक विकास दर ३.१ टक्के राहिला. तो आता २०२३ मध्ये केवळ २.१ टक्के राहील अशी शक्यता आहे.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जागतिक बँकेने २०२४ चा अनुमानीत जागतिक विकास दरही घटवून २.४ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी जानेवारी २०२३ मध्ये हा दर २.७ टक्के राहील असे अनुमान व्यक्त केले होते. केंद्रीय बँकांच्या कठोर पतधोरण आढाव्यांचा परिणाम निवासी गुंतवणुकीवर दिसून येत असल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे.
या वर्षी जानेवरीत जागतिक बँकेने २०२३ मध्ये जागतिक विकास दर म्हणजे जीडीपी १.७ टक्के राहील, असे अनुमान व्यक्त केले होते. मात्र अलिकडील काही महिन्यांत अर्थव्यवस्थांमधील सुधारणांनंतर हा दर वाढवून २.१ टक्के केला. मात्र, २०२४ साठीचा अनुमानीत विकासदर २.७ टक्क्यांवरून घटवून २.४ टक्क्यावर आणला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हपासून ते भारताच्या आरबीआयपर्यंत आणि ब्रिटनच्या बँक ऑफ इंग्लंडसारख्या केंद्रीय बँकेने जी व्याज दरवाढ केली आहे, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीवर दिसून येत आहे.