कर्नाल : अवकाळी पावसासह असंख्य आव्हानांमुळे यंदा देशभरात गव्हाच्या उत्पादनात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होते. मात्र, याऊलट स्थिती झाली आहे. केंद्र सरकारच्या देशात ११२ मिलियन मेट्रिक टन उत्पादनाच्या अनुमानापेक्षा अधिक, ११२.७४ मिलियन मेट्रिक टन गव्हाचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. भारतीय गहू तथा जवस संशोधन संस्था कर्नालच्या संशोधकांनी गव्हाचे उत्पादन ११४ ते ११५ मिलियन मेट्रिक टन होईल, असे चौथे अंतिम अनुमान वर्तवले आहे. कारण, यंदा गव्हाचे लागवड क्षेत्र गेल्यावर्षीच्या ३३ मिलियन हेक्टरवरून वाढून ३४ मिलियन हेक्टरवर पोहोचले.
दैनिक ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार, देशभरात गव्हाच्या उत्पादनात मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. या राज्यात गव्हाचे लागवड क्षेत्र आणि उत्पादकता दोन्ही वाढली आहे. भारतीय गहू आणि जवस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यापर्यंत उत्पादनाचे उद्दिष्ट ११२ टनाचे होते. मात्र, आताच्या तीन अनुमानांमध्ये हे उत्पादन ११२.७४ पर्यंत पोहोचले आहे. चौथ्या अनुमानात ११४ ते ११५ मिलियन मेट्रिक टनावर उत्पादन होईल, अशी शक्यता आहे. कारण, गतवर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्र एक मिलियन हेक्टरने वाढले आहे.
देशात गेल्या पाच वर्षात विकसित गव्हाच्या प्रजातींचे ८२ टक्केपेक्षा अधिक पेरणी करण्यात आली. मार्च महिन्यात तापमानात घट झाली. त्यामुळे गहू पक्व होण्याचा कालावधी १० ते १२ दिवसांनी वाढला. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले. मात्र, तोपर्यंत गव्हाचे पिक पक्व होवून त्याचे दाण्यात रुपांतर झाले होते, असे संशोधकांनी सांगितले. अशा स्थितीत शेतकरी आणि आम्ही चिंतीत होतो. मात्र, नुकसान कमी झाले असे संशोधकांनी स्पष्ट केले.