राज्य सरकारच्या निर्देशानुसार साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाशी संबंधीत कामाला गती देण्यासाठी तसेच ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी ऊस विकास समिती, साखर कारखाने, महिला स्वयंसाह्य गट तथा युवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ऊस विकास विभागाच्यावतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट उत्पादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी दिली. राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून ऊस उत्पादकता वाढीसह शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढविण्याचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. ऊस शेतीमध्ये उत्पादकतेचा नवा उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यंना सन्मानीत करण्याची अनोखी योजना ऊस विकास विभागाने राबवली आहे. या अंतर्गत आगामी १० जून २०२३ रोजी लोकभवनातील ऑडिटोरियममध्ये राज्य ऊस उत्पादन स्पर्धा पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे.
या समारंभात ऊस उत्पादन स्पर्धेतील तीन योजनंच्या विजेत्यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात राज्य ऊस स्पर्धा, राष्ट्रीय कृषी विकास योजना तथा उत्कृष्ट कार्य योजनेअंतर्गत उत्पादकतेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या विजेत्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी ऊस विकास समिती, उत्कृष्ट काम करणाऱ्या साखर कारखाने, महिला स्वयंसाह्यता गटांच्या माध्यमातून शेतीमध्ये नव तंत्रज्ञान वापरणाऱ्या युवक शेतकऱ्यांचा सन्मान केला जाईल.
या समारंभात विविध ऊस परिक्षेत्रातील १३५ विजेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान होईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. कार्यक्रमात सहकारी ऊस तथा साखर कारखाना समित्यांकडून गेल्या सहा वर्षात उभारणी केलेल्या २० भवनांचे लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी दिली.