लखनौ : गेल्या पाच वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) माध्यमातून एकूण २,१३,४०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. याबाबत पीटीआयच्या हवाल्याने बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्यातील ऊस उत्पादकता स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, २०१७ आणि २०२३ या काळात डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २,१३,४०० कोटी रुपयांची ऊस बिले मिळाली आहेत.
आदित्यनाथ म्हणाले की, आधीच्या सरकारच्या काळात ऊस उत्पादकांची बिले अनेक वर्षे प्रलंबित राहात होती. मात्र, आता एका आठवड्यात पैसे दिले जात आहेत. सहा वर्षांपूर्वी राज्यातील ऊस उत्पादकांच्या वजन पावत्यांमध्ये त्रुटी असायच्या, त्याची चोरी होत असल्याने शेतकरी त्रस्त होते असा आरोप योगी यांनी केला. याशिवाय कारखाने कधीही बंद केले जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत होती. मात्र, आता शेतकऱ्यांना एका आठवड्यात ऊस बिले दिली जात आहेत.
राज्यातील सर्व ११८ कारखाने दहा दिवसांत शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास प्राधान्य देतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यांनी ऊस विभागाच्या कामगिरीचा आढावा घेताना सांगितले की, पूर्वेकडील बंद पडलेले चार कारखाने सुरू करण्यात आले आहेत. आणि दोन नवे कारखाने उभारण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.