संभल : जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देत आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी उपकरणे, खते, बियाणे, औषधे दिली जात आहेत. तरीही जिल्ह्यातील शेतकरी उसापासून दूरावत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या एक वर्षात ऊस लागवड ३,११५ हेक्टरने घटले आहे. यंदाही ऊस लागवडीच्या क्षेत्रफळात घट होण्याची शक्यता आहे. ऊस पिकावर वाढत्या किड, रोगांचा हल्ला हे यामागील मुख्य कारण मानले जात आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संभल जिल्ह्यात ५१ हजार २५० हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यतील तिन्ही कारखान्यांनी हंगामात ६२६.५१ लाख क्विंटल उसाची खरेदी केली. असमोलीतील डीएसएम साखर कारखान्याने यंदा १०० टक्के ऊस बिले अदा केली आहेत. जीएसएम साखर कारखाना रजपुराने ९९.७७ टक्के आणि व्हीनस साखर कारखाना मझावलीने ९७.०७ टक्के बिले दिली आहेत.
याशिवाय साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दरवर्षी अनुदानावर कृषी यंत्र, औषधे, खते, बियाणे दिली जातात. तरीही ऊस लागवड क्षेत्र घटत आहे. जिल्हा ऊस अधिकारी राजेश्वर यादव यांनी सांगितले की, यावर्षी ५१,२५० हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. तर गेल्यावर्षी जिल्ह्यात ५४,३६५ हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. वेळेवर ऊस बिले मिळत असूनही शेतकऱ्यांचा ऊस पिकाकडील ओढा कमी होत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात येते.