इस्लामाबाद : पाकिस्तानने सध्या रशियाकडून थेट कच्च्या तेलाची आयात सुरू केली आहे. रविवारी रशियाकडून पहिला तेल टँकर कराचीत पोहोचला. या टँकरमधून ४५,००० मेट्रिक टन कच्चे तेल आयात करण्यात आले आहे. या तेलाचे पाकिस्तानातील रिफायनरींमध्ये परीक्षण करण्यात येणार आहे. त्याचा निष्कर्ष समाधानकारक आला तर पाकिस्तान रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करणार आहे. मात्र, पैशांच्या देवाण-घेवाणीच्या समस्येमुळे चीनच्या युआन या चलनामध्ये व्यवहार करण्याची वेळ कंगाल पाकिस्तानवर आली आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पाकिस्तानला रशियाकडून कच्चे तेल घेताना पैशाच्या देवाण-घेवाणीची समस्या भेडसावत आहे. पाकिस्तानला इच्छा असूनही रशियाला डॉलरमध्ये पेमेंट करता येत नाही. रशियाकडून तो उधारीवर कच्च्या तेलाची खरेदी करू शकत नाही. अशा स्थितीत पाकिस्तान चीनचे चलन युआनमध्ये रशियाला इंधन खरेदीचे पैसे देत असल्याचे उघड झाले आहे.
पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री मुसादिक मलिक यांनी सांगितले की, अमेरिकन डॉलरच्या प्रभावाखालील धोरणात मोठा बदल करण्यात येत आहे. पाकिस्तानचा सध्याच्या परकीय चलन साठा चार आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे. रशियाकडून पाकिस्तानने सवलतीच्या दरात केलेली इंधन खरेदी हा दोन सरकारांमधील व्यवहार आहे. एप्रिलमध्ये झालेल्या १,००,००० टन कच्च्या तेलाच्या खरेदी व्यवहारापैकी ४५,००० टन कच्चे तेल कराची बंदरात पोहोचले आहे. उर्वरीत तेलही लवकरच येथे येईल.