बिपरजॉय चक्री वादळाबाबत जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली/गांधीनगर : देशात सक्रीय असलेले बिपरजॉय चक्रीवादळ अत्यंत तीव्र या क्षमतेपासून १३ जून रोजी कमकुवत स्थितीत आले आहे. मात्र, गुजरातच्या सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर त्याचा प्रभाव कायम आहे. गुजरात सरकारने १३ जूनपासून चक्रीवादळ सक्रिय असलेल्या ५ किलोमीटर पर्यंतच्या संवेदनशील भागातील लोकांचे स्थलांतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि १० किमीपर्यंतच्या झोपड्या आणि कच्चा घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना १४ जूनपर्यंत सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल. बिपरजॉय हे गेल्या पंचवीस वर्षांत गुजरात किनारपट्टी ओलांडणारे पहिले चक्रीवादळ ठरले आहे.
दरम्यान, या वादळामुळे तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये ८,००० लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सहा किनारी जिल्ह्यांतील शाळांही बंद करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चक्रीवादळ १६ जून रोजी नैऋत्य राजस्थानमध्येही दाखल होण्याची शक्यता आहे. यादरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर पश्चिम रेल्वेने काही रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. याबाबत माहितीसाठी रेल्वेने एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

भारतीय रेल्वेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय केला आहे. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्षदेखील सुरू असल्याचे वृत्त पीटीआयने वृत्त दिले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अलर्ट असल्याचे मदत आयुक्त आलोक कुमार पांडे यांनी सांगितले. आमच्याकडे एनडीआरएफच्या १२ टीम आहेत आणि ते कच्छ, पोरबंदर, जुनागड, जामनगर, द्वारका, गीर सोमनाथ, मोरबी आणि राजकोट जिल्ह्यात तैनात आहेत असे त्यांनी सांगितले.

अनेक गाड्या रद्द…
भारतीय हवामान खात्याने (IMD) बिपर जॉय चक्रीवादळ जमिनीवर येण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवल्याने पश्चिम रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून १५ जून रोजी ६७ गाड्या रद्द केल्या आहेत. चक्रीवादळ सौराष्ट्र प्रदेश आणि कच्छच्या किनारपट्टीच्या जुनागढ, पोरबंदर, देवभूमी द्वारका, जामनगर आणि मोरबी जिल्ह्याला धडकण्याची शक्यता आहे. या परिसरातून जाणाऱ्या इतर गाड्यांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने १४ जून ते १५ जून दरम्यानच्या गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे.२३ गाड्या कमी केल्या आहेत.

उपाययोजनांना गती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जून रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. आणि येऊ घातलेल्या चक्रीवादळ बिपरजॉयच्या तयारीबाबत आढावा घेतला. बैठकीत त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना गुजरात सरकारच्या संपर्कात राहून संवेदनशील ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल याची खात्री करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कच्छमध्ये आहेत.

ऑरेंज अलर्ट जारी…
बिपरजॉयमध्ये किमान ४५-५५ किमी प्रतितास वेगाने तर कमाल ६५ किमी वेगाने वादळी वारे वाहतील. त्यामुळे चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असतानाही, आयएमडीने सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीसाठी आपला ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. या काळात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, १५ जून रोजी दुपारच्या सुमारास कच्छमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान प्रतितास १२५-१३५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची, चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here