जी 20 कृषी मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चित्रफितीद्वारे संदेश देत जी 20 कृषी मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले.

पंतप्रधानांनी या बैठकीला संबोधित करताना सर्व मान्यवरांचे भारतात स्वागत केले आणि शेती हा मानवी संस्कृतीचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. कृषीमंत्र्यांची जबाबदारी केवळ अर्थव्यवस्थेचे एक क्षेत्र हाताळण्यापुरती मर्यादित नसून मानवतेचे भवितव्य सुरक्षित करण्याची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर आहे, असे त्यांनी नमूद केले. जागतिक स्तरावर 2.5 अब्जहून अधिक लोकांसाठी शेती हे उदरनिर्वाहाचे साधन आहे आणि ग्लोबल साउथमध्ये, जीडीपीमध्ये शेतीचा वाटा जवळपास 30 टक्के आणि नोकऱ्यांमध्ये 60 टक्के आहे, याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. महामारीमुळे अडथळे आलेली पुरवठा साखळी भ- राजकीय तणावाच्या प्रभावामुळे अधिक विस्कळीत झाल्याचे त्यांनी आज ग्लोबल साउथसमोर असलेली आव्हाने अधोरेखित करताना सांगितले. हवामान तीव्रतेच्या घटना अधिकाधिक वारंवार घडत असल्याचे सांगत त्यांनी हवामानातील बदलांच्या मुद्द्याला स्पर्श केला.

कृषी क्षेत्रातील भारताच्या योगदानावर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी भारताच्या ‘बॅक टू बेसिक्स’ आणि ‘मार्च टू फ्यूचर’ या धोरणावर प्रकाश टाकला आणि भारत नैसर्गिक शेती तसेच तंत्रज्ञान सक्षम शेतीला प्रोत्साहन देत असल्याचे अधोरेखित केले. “संपूर्ण भारतातील शेतकरी आता नैसर्गिक शेती करत आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. शेतकरी आता कृत्रिम खते किंवा कीटकनाशके वापरत नाहीत. धरती मातेचे पुनरुज्जीवन करणे, मातीचे आरोग्य संरक्षित करणे, ‘प्रति थेंब, अधिक पीक’ उत्पादन करणे आणि सेंद्रिय खतांचा वापर तसेच कीटक व्यवस्थापनाच्या इतर पर्यायांना प्रोत्साहन देणे यावर शेतकऱ्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. उत्पादकता वाढवण्यासाठी आमचे शेतकरी अंत: स्फूर्तीने तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत तसेच त्यांनी त्यांच्या शेतात सौर उर्जा निर्माण करणे आणि वापरणे सुरू केले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. योग्य पीकाची निवड करण्यासाठी मृदा आरोग्य कार्डचा वापर आणि पोषक द्रव्य फवारणीसाठी तसेच पिकाच्या निगराणीसाठी ड्रोनचा वापरही शेतकऱ्यांकडून केला जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील अनेक समस्या सोडवण्यासाठी ‘मिश्र दृष्टिकोन’ हा सर्वोत्तम मार्ग आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मान्यवरांना याची प्रचिती हैदराबादमध्ये भरड धान्य किंवा श्री अन्नापासून बनवलेले अनेक पदार्थ त्यांना जेवणासाठी वाढलेल्या ताटात पाहिल्यावर येईलच, असे पंतप्रधान म्हणाले. हे सुपरफूड केवळ खाण्यासाठी आरोग्यदायी नसून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणारे आहे, कारण या पिकाला पाणी आणि खतांची कमी आवश्यकता असते असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात हजारो वर्षांपासून तभरड धान्याची लागवड केली जात आहे परंतु बाजारपेठ आणि विपणनाच्या प्रभावामुळे पारंपरिकपणे पिकवलेल्या भरड धान्य अन्न पिकांचे मूल्य नष्ट झाले आहे, असे पंतप्रधानांनी भरड धान्याच्या इतिहासावर प्रकाश टाकताना सांगितले. “आपण आपल्या आवडीचे अन्न म्हणून श्री अन्न भरड धान्याचा स्वीकार करुया”, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारत भरडधान्यामधील सर्वोत्तम पद्धती, संशोधन आणि तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठी उत्कृष्ट केंद्र म्हणून भरड धान्य संशोधन संस्था विकसित करत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

जागतिक अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी सामूहिक कृती काय करता येईल, यावर विचार करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी कृषी मंत्र्यांना केले. अल्पभूधारक शेतकर्‍यांवर लक्ष केंद्रित करणारी आणि खत पुरवठ्याची जागतिक साखळी मजबूत करण्‍यावर भर देतानाच शाश्वत आणि सर्वसमावेशक अन्न प्रणाली तयार करण्यासाठी मार्ग शोधण्यात यावेत, असे त्यांनी सुचवले. याबरोबरच पंतप्रधानांनी मातीचे आरोग्य, पिकांचे आरोग्य आणि उत्पादन चांगले ठेवण्यासाठी योग्य कृषी पद्धतींचा अवलंब करण्यास सांगितले. जगाच्या विविध भागांतील पारंपरिक पद्धती, आपल्याला पुनरुत्पादक शेतीचा पर्याय विकसित करण्यासाठी प्रेरित करू शकतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नवोन्मेषी संकल्पना आणि डिजिटल तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आणि ग्लोबल साउथमधील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडतील असे, उपाय शोधण्यावर त्यांनी भर दिला. कचर्‍यापासून संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करताना आलेले पीक आणि अन्नधान्य यांचा अपव्यय कमी करण्याची तातडीने गरजे आहे, या विषयालाही त्यांनी स्पर्श केला.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ जी-20 अंतर्गत भारताने कृषी क्षेत्रातील प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. यानुसार ‘एक वसुंधरे’चे आरोग्‍य सुदृढ करण्‍यावर, आपल्या या ‘एका कुटुंबात’ सौहार्द निर्माण करण्यावर, आपल्या सर्वांचे उज्ज्वल असे ‘एक भविष्य’ निर्माण देण्यावर लक्ष्‍य केंद्रित केले आहे. ठोस परिणाम मिळावेत यासाठी, ‘अन्न सुरक्षा आणि पोषणावरील डेक्कन उच्च-स्तरीय तत्त्वे’ त्याचबरोबर बाजरी आणि इतर धान्यांविषयीचा ‘महर्षी’ उपक्रम या दोन उपक्रमांवर काम सुरू असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “या दोन उपक्रमांना दिलेले समर्थन हे सर्वसमावेशक, शाश्वत आणि लवचिक शेतीला समर्थन देणारी कृती आहे”, असे पंतप्रधान मोदी अखेरीस म्हणाले.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here