नगर : अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील आणि खासदार सुजय विखे- पाटील यांच्या पॅनलला धक्का देत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला.
थोरात – कोल्हे गटाला १९ पैकी १८ जागा मिळाल्या. विखे पाटील गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. विखे- पाटील विरुद्ध थोरात लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. थोरात – कोल्हे गटाचे उमेदवार सुमारे ७०० मतांच्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये विजय दंडवते, पांडुरंग डांगे, संपत हिंगे, महेंद्र गोरडे, बाळासाहेब चोळके, अरुंधती फोपसे, सुधीर लहारे, विष्णुपंत शेळके, अनिल गाढवे, संपत चौधरी, अनिल टिळेकर, अलेश कापसे, मधुकर सातव, शोभाताई गोंदकर, कमलताई धनवटे यांचा समावेश आहे.