गयाना भारताच्या मदतीने साखरेचे उत्पादन वाढवणार

जॉर्जटाउन : गयाना सरकार साखर उद्योगाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे चालू वर्ष अखेरीपर्यंत गयाना शुगर कॉर्पोरेशन (GuySuCo) सुमारे ६०,००० टन साखरेचे उत्पादन करेल, अशी अपेक्षा गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इरफान अली यांनी व्यक्त केली. ईस्ट कोस्ट डेमेरारा (ECD) येथे बोलताना डॉ. अली म्हणाले की, आपण यावर्षी साठ हजार टन साखर उत्पादनापर्यंत पोहचण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. नवीन वर्षात एक लाख टन साखर उत्पादन करण्याच्या दिशेने आम्ही काम करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. इरफान अली यांनी साखर उद्योगासमोर उसाचे लागवड क्षेत्र वाढवणे हे एक महत्त्वाचे आव्हान असल्याचे सांगितले. यासाठी गयाना भारत, ग्वाटेमाला आणि डोमिनिकन रिपब्लिक या आपल्या तीन परदेशी भागीदारांना साखर उत्पादन वाढीच्या मोहिमेत सहभागी करून घेत असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर उसाचा योग्य वाण निश्चित करणे, त्याची लागवड वाढवण्यासाठी आवश्यक संशोधनात्मक मदत भारत, ग्वाटेमाला आणि डोमिनिकन रिपब्लिक यांच्याकडून घेतली जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष डॉ. अली म्हणाले की, हे भागीदार गयानाला उसाच्या नवीन रोपवाटिका तयार करण्यास मदत करतील. यातून उसाच्या सर्वात योग्य जाती विकसित होतील, असे सीएनडब्ल्यू न्यूजमध्ये प्रकाशित वृत्तामध्ये म्हटले आहे.

GuySuCO च्या साखर क्षेत्रातील विस्तार योजनांना पाठबळ देण्यासाठी सरकारने २०२३ मधील राष्ट्रीय अर्थसंकल्पात भरभक्कम तरतूद केली आहे. डिसेंबरमध्ये, संसदीय समितीने साखर उद्योगासाठी मदत म्हणून GuySuCo ला एक अब्ज डॉलरचा निधी मंजूर केला आहे. साखर क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकार करीत आहे. त्याचा उद्योगाला फायदा होईल, अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्ष अली यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here